जालना : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 11 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे त्यांचं लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे आग्रह धरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.


या संदर्भात राज्यातील कोविड टास्क फोर्सचे देखील मुलांच्या लसीकरण करण्यात यावे असे मत आहे. या मुलांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी हे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जगभरामध्ये आता 11 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आपल्याकडे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु नाही. पण या वयोगटातील मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर त्याचा प्रसार हा वृद्ध वयोगटातील व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरला आहे. 


नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत 100 टक्के पहिल्या डोसचे नियोजन
राज्यातील लसीकरणावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील 100 लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आलं आहे.


टास्क फोर्स काय म्हणतं? 
राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावं आणि मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने  दिलाय.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha