मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणामध्ये आल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यावर आता मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल आहे. पण लहान मुलांच्या लसिकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात असा कोविड टास्क फोर्सचा आग्रह आहे.


मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरता मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवली आहे. तसं राज्य सरकारलाही कळवण्यात आलं आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं राज्य सरकारला कळवलं आहे. 


राज्यातील कोरोना अनलॉकनंतर सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील  कोविड केसेस नगण्य असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे बगीचे, क्रिडांगणे ,बाजार  याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असतांना शाळा सुरु करण्यास हरकत नाही असे महापालिकेचे मत आहे.


टास्क फोर्स काय म्हणतं? 
राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावं आणि मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसिकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने  दिलाय.


येत्या मंगळवारी टास्क फोर्सची याबाबत एक बैठक आहे. त्यामध्ये शाळा सुरु करायच्या की नाहीत यावर काहीतरी ठोस निर्णय होणं अपेक्षित आहे. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha