Angarki Sankashti Chaturthi 2021 : गणपतीपुळेला राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. अंगारकी संकष्टीला तर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक याठिकाणी येतात. पण, कोरोनामुळे मात्र सर्वांचा हिरमोड झाला होता. आता कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी होत असल्यानं नियमांमध्ये देखील शिथिलता मिळत आहे. दीड वर्षानंतर अंगारकीला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन होणार असल्यानं भाविकांमध्ये वेगळाच आनंद आहे. गणपतीपुळेला यावेळी जवळपास 50 ते 60 हजार भाविक यावेळी दर्शन घेण्याची शक्यता आहे. पहाटे 3.30 वाजल्यापासून दर्शन सुरू होणार आहे. एकंदरीत भाविकांची संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि भाविकांची सुरक्षितता म्हणून काही निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतले आहे. यापैकी एक म्हणजे दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्र किनारी पोहोण्यास मज्जाव असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी याची माहिती दिली आहे. केवळ सुरक्षितता हाच यातील उद्देश असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.


आणखी काय आहेत नियम?


मुख्य बाब म्हणजे याकाळात भाविकांना कोरोना नियमांंचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. यावेळी मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी भरारी पथकांची देखील नेमणूक केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय, गणपती मंदिर परिसरात यावेळी मोठे स्टॉल देखील लावले जातात. पण, संपूर्ण परिस्थितीचा विचार केल्यास बाहेरच्या लोकांना या ठिकाणी स्टॉल लावता येणार नाहीत. केवळ स्टॉल लावता येणार आहेत. यावेळी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असल्यास त्याला प्राधान्य असेल असं देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, येणाऱ्या प्रत्येक भाविकानं कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील यावेळी केलं गेलं आहे. 


गणपतीपुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या, वाहनांची संख्या पाहता पोलिस बंदोबस्त, दर्शनाच्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:


स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी...


परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा, कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण