एक्स्प्लोर
Advertisement
अमित ठाकरेंच्या लग्नाचं राहुल गांधींना निमंत्रण, मोदी-शाहांचं यादीत नाव नाही
राज ठाकरेंच्या सचिवांनी दिल्लीला जाऊन अमित ठाकरेंच्या लग्नाची आमंत्रणं दिली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरेंनी दिलेल्या निमंत्रितांच्या यादीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीचं नाव नाही.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी लगीनघाई सुरु आहे. राज ठाकरेंनी पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नाचं आमंत्रण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना राज ठाकरेंनी निमंत्रण दिलं नसल्याची माहिती आहे.
येत्या 27 जानेवारीला अमित ठाकरे मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहेत. राज ठाकरे यांनी राजकीय वर्तुळापासून चित्रपट आणि उद्योग विश्वातील अनेक मान्यवरांना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. इतकंच काय, 'मातोश्री'वर जाऊन खुद्द राज ठाकरेंनी चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण दिलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनाही या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं.
राज ठाकरेंचे सचिव हर्षल देशपांडे आणि मनोज हाटे यांनी दिल्लीला जाऊन आमंत्रणं दिली. 6 जानेवारीच्या रात्री दिल्लीला रवाना झाल्यानंतर दोघांनी दोन दिवसांत सर्वांना निमंत्रणं दिली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरेंनी सचिवांना दिलेल्या निमंत्रितांच्या यादीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीचं नाव नाही.
दिल्लीत राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजप सरकारमधील नेते, खासदार, मंत्र्यांनाही आमंत्रण देण्यात आलं, मात्र मोदी-शाहांना आमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज ठाकरेंच्या निमंत्रितांच्या यादीत कोण कोण?
भाजप सरकारमधील नेते
अर्थमंत्री अरुण जेटली
गृहमंत्री राजनाथ सिंह
दळणवळण मंत्री नितीन गडकरी
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन
महिला-बालकल्याण मंत्री मेनका गांधी
शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी
ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी
राज्यमंत्री सत्यपाल सिंह
काँग्रेसमधून कोण कोण
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह
केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले
अर्थात, लग्नाला 15 दिवसांचा कालावधी असल्याने तोवर निमंत्रण पाठवण्यास वेळ आहे, किंवा यापूर्वी अन्य माध्यमातून मोदींना निमंत्रण पाठवलं गेल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अमितचं लग्न अत्यंत साधेपणानं होणार असल्याचं राज ठाकरेंनी गेल्या महिन्यात नाशिक दौऱ्यावर असताना सांगितलं होतं. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिलं, तर तो आकडा सहा लाखांच्या घरात जातो. त्यामुळे उगाच वधू-वराची ससेहोलपट नको. म्हणून मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याचंही सांगत राज यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
राज ठाकरेंकडून अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचं निमंत्रण देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला होता. त्यावर 'त्यांचा लग्न या गोष्टीवर विश्वास आहे का?' असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरे निघून गेले होते. काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांशी झालेल्या भेटीत भाजपमधील कोणत्या नेत्यांना निमंत्रण द्यायचं, यावर दोघांची चर्चा झाल्याचं म्हटलं जात होतं.
कोणे एके काळी राज ठाकरे हे नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळत असत. मोदींचं निमंत्रण स्वीकारुन 2011 मध्ये राज ठाकरेंनी गुजरातला जाऊन त्यांची प्रशंसाही केली होती. राज ठाकरेंनीच मोदींना पंतप्रधानपदाचा प्रबळ दावेदार म्हटलं होतं. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राज ठाकरेंनी टीकेची झोड उठवली आहे. कार्टूनच्या माध्यमातून मोदींवर ताशेरे आणि राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळण्याची राज ठाकरेंची पद्धत निमंत्रणात प्रतिबिंबित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement