Rain News : पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, नागपूरसह पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट...
Rain News : आज पूर्व विदर्भात (East Vidarbha) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Rain News : सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार आहे. त्यामुळं आज पूर्व विदर्भात (East Vidarbha) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (19 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुरुवातीला हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात येलो अलर्ट दिला होता. मात्र, बदलती परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याची स्थिती आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मात्रस सध्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. आत्तापर्यंत काही जिल्हे सोडले तर बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हंगाम धोक्यात
पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र सध्या पाऊस पडत नसल्यानं पीकं धोक्यात आली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे. बऱ्यापैकी क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ झालं राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरलेली पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची (Kharif) उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास 35 लाख हेक्टरवरील संपूर्ण खरीप धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच वर्धा, भंडारा जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा तातुपरता मिळाला आहे. मात्र, सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. धरणांच्या नद्यांच्या पाणीसाठ्यात वाढ होणं गरजेचं आहे. अन्यथा राज्यातील काही भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: