(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिवंडी, परभणी, हिंगोलीसह काही जिल्ह्यात रात्रभर पाऊस; नदी खळखळली, ओढे-नाले भरले
राज्यात परभणी, हिंगोली, भिवंडीसह अनेक ठिकाणी रात्रभर पावसाने हजरे लावली. उकाड्याने हैराण झालेल्यांना या सरींमुळे मोठा दिलासा मिळाला.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी रात्रभर पावसाने हजरे लावली. उकाड्याने हैराण झालेल्या तसंच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना या सरींमुळे मोठा दिलासा मिळाला. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळी मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाने उसंती घेतलेली पाहायला मिळाली. मुंबईतही सकाळीच वरुणराजा प्रसन्न झाल्याने मुंबईकरही सुखावले. परंतु अर्धा तासानंतर पाऊस थांबला
हिंगोलीच्या पाचही तालुक्यांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव आणि हिंगोली या पाचही तालुक्यांमध्ये रात्री मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या तसंच पहाटेही काही भागात रिपरिप सुरु होती. सकाळी सात वाजता पावसाने विश्रांती घेतली. या मुसळधार पावसाने शेतात देखील पाणी साचले असून गेल्या काही दिवसापासून कोरडी असलेली कयाधू नदी आता खळखळून वाहू लागली आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आता खरिपाच्या पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
परभणीत ओढ्या,नाल्यांसह शेतशिवारात पाणीच पाणी परभणीतील 5 तालुक्यात काल (10 जून) दुपारी झालेल्या जोरदार पावसानंतर रात्री दोन वाजल्यापासून पहाटेपर्यंत जिल्हयात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडला.वादळी वार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात ओढ्या नाल्यांसह, शेतशिवारात पाणीच पाणी झालं. परभणी, मानवत, पाथरी, सेलु, जिंतूर, पुर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पहाटेपर्यंत कायम होता. पहाटे सहा वाजल्यापासून सर्वत्र ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस भिवंडी शहारासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल या आधीच्या पावसात झालेली आहे, त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच बाजारपेठ, तीन बत्ती मार्केट, बालाजी नगर, म्हाडा कॉलनीसारख्या सखल भागात पानी भरल्यास अनेक दुकानांमध्येही पाणी शिरण्याची भीती नागरिकांमध्ये होती.
वाशिम वाशिम जिल्ह्यात सकाळी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडकडात पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे.
सिंधुदुर्ग तर तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रात्री पावसाने हजेरी लावली. मात्र सकाळपासून जिल्ह्यात ऊन पडलेलं दिसत आहे.