Raigad Suspicious Boat: आफ्रिका- युरोप समुद्र मार्गांवरील खासगी बोटींवर एके-47 कशासाठी? जाणून घ्या
Raigad Suspicious Boat: मालवाहू जहाजांवर खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांच्याकडे एके-47 सारखी अत्याधुनिक शस्त्रे का असतात, जाणून घ्या...
Raigad Suspicious Boat: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटमध्ये (Raigad Suspicious Boat) तीन एके-47 आणि जवळपास 250 जिवंत काडतूसे आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर राज्यात हायअलर्ट जारी (High Alert in Maharashtra) करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर आढळलेली बोट ओमानमधून आल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिलेल्या निवेदनानुसार ही बोट मस्कत येथून युरोपला समुद्रमार्गे जाणार होती. आखाती देशातून युरोपात जाणाऱ्या बोटींवर शस्त्रे का असतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
आखाती देश आणि आफ्रिकन देशांच्या समुद्र मार्गातून जाणाऱ्या मालवाहू जहाजांमध्ये शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असतात. या जहाजांना सोमालियन समुद्र चाच्यांचा धोका असतो. सोमालियन चाच्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी या मोठ्या मालवाहू जहाजांवर खासगी सुरक्षा रक्षक तैनात केलेले असतात. समुद्र मार्गे मालवाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्या खासगी सुरक्षा एजन्सीकडून सुरक्षा स्वीकारतात. ही सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक प्रशिक्षित असतात. त्यांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. या सुरक्षा एजन्सी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करतात. त्यामुळे खासगी बोटींवर एके-47 असतात.
रायगडमधील श्रीवर्धनमध्ये आढळून आलेली संशयास्पद बोट हीदेखील एका सुरक्षा एजन्सीची असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तूर्तास तरी या बोटीचा दहशतवाद्यांची संबंध नसल्याचे दिसून येत आहे. हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आढळलेल्या बोटीवर एका कंपनीच्या नावाचा बॉक्स आढळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीशी सुरक्षा यंत्रणांनी संपर्क साधला आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत त्यांची नौका पलटी झाल्याची माहिती कंपनीने सुरक्षा यंत्रणांना दिली. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी शक्यता आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधल्यानंतर बोटीतील शस्त्रे त्या कंपनीच्या मालकीची असल्याच्या दाव्याला दुजोरा देण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक सूत्रांनी दिली. महाराष्ट्र पोलीस, गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात येत आहे.
समुद्री चाचे कोण असतात?
समुद्री चाचे हे किनाऱ्याजवळून जाणारी जहाजे अडवून किंवा त्यावर ताबा मिळवतात. समुद्री चाचे मोठ्या जहाजांवर प्रवेश करण्यासाठी छोट्या छोट्या नौका वापरतात. मालवाहू जहाज समुद्राच्या मध्यभागी येण्याची चाचे वाट पाहतात. खोल पाणी असलेल्या ठिकाणी जहाज आले की समुद्री चाचे आपला डाव साधतात. छोट्या नावेतून आलेले हे चाचे त्या जहाजाला चारही बाजूंनी घेरतात आणि जहाजात प्रवेश करतात. त्यानंतर खलाशांना ते धमकावतात मालाची लूटमार करतात. काही वेळा जहाजे ओलीस ठेवून मोठी खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिकेच्या किनारपट्टीवर समुद्री लुटमारीचा मोठा धोका असतो. काही वर्षांपूर्वी नायजेरिन समुद्री चाचे मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. सध्या सोमालिया आणि एडनचे आखात समुद्रातील लुटीसाठी कुप्रसिद्ध झाले आहे. समुद्रातील लुटीला आळा घालण्यासाठी काही देशांकडून संयुक्तपणे कारवाई सुरू असते.