Mumbai-Pune Expressway वर गॅस टँकर उलटून कारला धडकला, तीन प्रवाशांचा मृत्यू
Mumbai-Pune Expressway Accident: बोरघाटातील खोपोली एक्झिटनजीक गॅस टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो पलटी झाला. गॅस टँकरने पलिकडच्या लेनमधील दोन गाड्यांना धडक दिली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात आज (9 मे) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरुन भरधाव येणाऱ्या केमिकल टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर पुण्याच्या दिशेने निघाला होता. याचवेळी, बोरघाटातील खोपोली एक्झिटनजीक गॅस टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो पलटी झाला. यावेळी, गॅस टँकरने पलिकडच्या लेनमध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील दोन गाड्यांना धडक दिली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस यंत्रणा, देवदूत यंत्रणा आणि सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाले होते. तर, या अपघातामुळे गॅस टँकरमधील गळतीची तपासणी करण्यासाठी केमिकल एक्सपर्टना पाचारण करण्यात आलं होतं.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. तर, या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. वाहतूक धीम्या गतीने सुरु होती.
बोरघाटातील अपघातग्रस्त गॅस टँकर बाजूला करण्यात यश आलं आहे. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत झाली असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. सुमारे तीन तासांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बोरघाट अपघातातील मृतांची नावं
या अपघातात तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला. यापैकी दोघांची ओळख पटली असून तिसऱ्या मृताचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. सागर जनार्धन देशपांडे, (वय 51 वर्षे), योगेश बी सिंह (वय 47 वर्षे, रा. पुणे) अशी ओळख पटलेल्या मृतांची नावं आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या