(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रायगड जिल्ह्यात काही रुग्णांमध्ये दुष्परिणाम आढळल्याने रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे प्रशासनाचे आदेश
कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा वापर न करण्याचे आदेश रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. रेमडेसिवीरचे इंजेक्शन देण्यात आलेल्या 120 पैकी 90 रुग्णांमध्ये काही दुष्परिणाम आढळल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला
रायगड: जिल्ह्यात पुरवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. तांत्रिक कारणामुळे हेटेरो हेल्थकेअर कंपनीकडून वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रायगड जिल्ह्याला 500 इंजेक्शन पुरवण्यात आले होते, त्यापैकी 120 इंजेक्शन देण्यात आले होते. कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा वापर करु नये असं अन्न व औषध प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी या विषयावर म्हणाल्या की, या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केल्यानंतर काही लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये रक्तदाब कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि इतरही काही तक्रारी रायगड जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर लागोलाग जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाला या स्टॉकचा वापर थांबवण्याचे आदेश दिले.
ज्या 120 रुग्णांना ही इंजेक्शन देण्यात आली होती त्यामध्ये 90 रुग्णांमध्ये अशा प्रकारची दुष्परिणाम दिसून आले. त्यामुळे उर्वरित स्टॉक परत मागवण्यात आला. राज्य शासनाकडूनही या स्टॉकचा वापर थांबवावा अशा प्रकारची सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.
रेमडेसिवीर कधी आणि कुणाला द्यायचे याच्याबद्दल स्टेट टास्क फोर्सने स्पष्टपणे सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं असे आदेश रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Crisper Cass: 'क्रिस्पर कॅस'ने होणार कोरोनाचे अचूक आणि जलद निदान, टाटा समूहाने विकसित केलं नवं तंत्रज्ञान
- Maharashtra Corona : तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- Maharashtra Corona Cases : राज्यात आज नवीन रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्णांना डिस्चार्ज