पुणतांबा कृषीकन्या उपोषण, एका मुलीला रुग्णालयात हलवलं
रात्री जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी उपोषण स्थळी या मुलींची भेट घेतली. त्यावेळी शुभांगीची तब्येत खालावल्याचं लक्षात आलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ शुभांगीला रुग्णालयात उपचार सुरु केले.
अहमदनगर : पुणतांबा येथे गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कन्या उपोषण करत आहेत. यातील शुभांगी जाधव या तरुणीची तब्येत रात्री अचानक खालावली आहे. त्यामुळे तिला अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शुभांगीवर सध्या उपचार सुरु असले तरी ती उपोषण करण्यावर ठाम आहे. शेतमालाला हमीभाव, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुधाला 50 रुपये प्रतिलिटर भाव यासह अन्य मागण्यांसाठी पुणतांब्यात मुलींचं उपोषण सुरु आहे.
रात्री जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी उपोषण स्थळी या मुलींची भेट घेतली. त्यावेळी शुभांगीची तब्येत खालावल्याचं लक्षात आलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ शुभांगीला रुग्णालयात उपचार सुरु केले. मात्र आपल्या मागण्यांसाठी रुग्णालयात देखील उपोषण सुरु ठेवणार असल्याच शुभांगीने सांगितलं आहे.
पुणतांबा गावातून 'देता की जाता' असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरु आहे. तर दुसरीकडे पुणतांबामधील कृषीकन्याही आक्रमक झाल्या आहेत. सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे.