Pune Vetal Hill Tunnel : कोथरुड - पाषाण आणि सेनापती बापट रस्त्यावरुन मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने; म्हणाले...
पुण्यातील वेताळ टेकडी फोडून कोथरुड - पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे.
Pune Vetal hill tunnel News : पुण्यातील वेताळ टेकडी फोडून (Pune Vetal hill tunnel) कोथरुड - पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे. यामुळे या तिन्ही भागातील वाहतूककोंडी कमी होण्यास आणि प्रवासाचं अंतर कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला असताना भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या प्रकल्पाला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पुण्याच्या मधोमध असलेली ही वेताळ टेकडी निसर्गसंपन्न आहे. एकीकडे पुण्यात सिमेंटचे जंगल उभं राहीलं असताना या टेकडीवर हजारो झाडं आणि त्यावर अधिवास करणारे मोर, लांडोर, पोपट यासारख्या पक्षांमुळे खरंखुरं जंगल टिकून आहे. मात्र आता ही टेकडी फोडून पुण्यातील कोथरुड - पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर करण्यात आला आहे. हे बोगदे झाल्यास पुण्याचा दक्षिण भाग आणि पुण्याचा उत्तर भाग यादरम्यान प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पुण्यातील कोथरुड- पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे बोगदे झाले तर वाहतूक कोंडी कमी होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि अंतर दोन ते अडीच किलोमीटरने कमी होईल. या प्रकल्पामुळे झाडे नष्ट होणार आहेत हे चुकीचं आहे. यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्यासह देखील अनेक माणसं आहेत. त्यांना त्यांची मतं आहेत. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू ऐकले तर ठिक आहे नाही तर ठरवू, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
मात्र या प्रकल्पला भाजपच्याच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह तीनही भागातील नागरिक विरोध करतायत. हे बोगदे झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार नसून वाढू शकते, असं मेधा कुलकर्ण यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यासोबतच या प्रकल्पामुळे पर्यावरणाची आणि तीन हजार झाडांची हानी होणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
हे बोगदे झाल्यास या टेकडीवरील तीन हजार झाडे हटवावी लागणार आहेत. या टेकडीच्या भोवताली असलेल्या जैववैविध्य्यावर त्याचा परिणाम होणार असल्याचं पर्यावरण प्रेमींच म्हणणंय. जमिनीखालील पाण्याचे साठे यामुळे नष्ट होतील असा दावा हे पर्यावरण प्रेमी करत आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत साडे तीन किलोमीटर अंतराचे तीन बोगदे तयार केले जाणार असून त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र या आधी पुण्यातील विकासकामांचा अनुभव पाहता वाहतूककोंडी कमी करण्यासाठी याचा खरंच उपयोग होईल का? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे