Pune Rain: हॅलो मी...! पुण्यात पाणीच पाणी झाल्याने महापालिकेत नागरिकांकडून 71 फोन
नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग कार्यालयांना दिवसभरात 71 कॉल आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली आहे.
Pune Rain: पुण्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे या हंगामातील सर्वात मोठा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला होता. खडकवासला धरणतून साखळी परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे मुठा नदीत झपाट्याने 30 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते.
दिवसभरात 71 कॉल
नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग कार्यालयांना दिवसभरात 71 कॉल आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली आहे. यामध्ये घर, वस्ती, सोसायटीत पाणी शिरल्याच्या तक्रारी आहेत. शहरात झाडपडीच्या सात घटना घडल्या आहेत.
पाणी साचलेल्या ठिकाणी पाणी साचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य ती कार्यवाही केली आहे. शहरात आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रत्येक प्रभाग कार्यालयात चोवीस तास कार्यालय सुरु केले आहे. यात 10 उपअभियंता, आरोग्य निरीक्षक आणि इतरांचा समावेश आहे. तसेच एक जेसीबी, एक जेटिंग मशीन, एक ट्रक आणि 25 जणांचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नदीकाठच्या परिसरात कोणालाही बाहेर काढण्याची गरज नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या भागातील रहिवाशांसाठी 39 शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाने बाधित झालेला भाग, सिंहगड रस्ते मोठमोठे खड्डे, कोथरुड येथील मुंढे वस्ती टेबल येथे पूर, कोंढवा येवलेवाडी येथील लघुउद्योगातील नाल्याला पूर, येरवड्यातील अमृतेश्वर मंदिरातील घरे, चांदणी चौकातील फसा सोसायटीत पाणी साचले. शहराच्या मध्यभागी मंदावलेली वाहतूक, भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे होणारी मोठी कोंडी या मूलभूत समस्या आहेत. नदीकाठचा रस्ता बंद झाल्यामुळे केळकर रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधीच खड्डेमय शहरातील अनेक रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला धरणातून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विसर्ग करण्यात आला. 30,000 क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना आणि नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच पुणे शहरातील मध्यभागी असलेल्या डेक्कन परिसरातील नदीपात्रात देखील भरपूर प्रमाणात पाणी आलं होतं. नदीपात्रातील भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.