(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll election : कसब्यात पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची अजब मागणी; मतदान...
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशन न वापरता मतपत्रिका वापराव्या,अशी मागणी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Pune Bypoll election : कसब्यातील उमेदवार (Pune Bypoll Election) आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (abhijeet Bichukle) अनेक कारणामुळे कायम चर्चेत असतो. यावेळी त्यांनी कसब्याच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशन न वापरता मतपत्रिका वापराव्या, अशी मागणी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य नाही केली तर 20 फेब्रुवारीपासून निवडणूक अधिकारांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे.
बिचुकले म्हणाले की, जनतेतून माझ्याकडे विशेष अशी मागणी होत आहे की आपण आमचा आवाज निवडणूक आयोगाकडे पोहोचवावा. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दल लोकांमध्ये देशभर संभ्रम निर्माण झाला आहे. लोकशाहीची ताकद ही जनताच असल्याने जनतेला हवे आहे की मतदान हे संपूर्णपणे बॅलेट पेपरवर घेण्यात यावे. विशेष म्हणजे 80 वर्षाच्यावरील मतदाराचे मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात येणार आहे असे पत्र आम्हाला निवडणूक अधिकारी यांनी पाठवले आहे. तर त्यांनी संपूर्ण जनतेचं मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी माझ्याकडे केली आहे, असं ते म्हणाले.
या सगळ्यासंदर्भात दोन दिवसांमध्ये मागणीनुसार निर्णय न झाल्यास सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने बॅलेट पेपर द्वारे मतदान व्हावे यासाठी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एकीकडे कसब्यात मतं मिळवण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रचारसभा, पद यात्रा काढल्या जात आहेत. त्यातच बिचुकले यांनी ही मागणी केली आहे. बिचुकलेदेखील जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारादरम्यान बिचुकले सगळ्यांना पत्रकांंचं वाटप करत आहेत. मात्र हे पत्रकं घेण्यासाठी नाही किंवा प्रचारात सहभागी होण्यासाठी नाही तर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते कसबा मतदार संघात गर्दी करताना दिसत आहे. त्यासोबत ज्या दुकानांमध्ये ते प्रचारासाठी जात आहे. त्या दुकानदारांकडून त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची ऑफर दिली जात आहे. मतासाठी बिचुकलेंना चाहत्यांच्या चहाच्या गाडीवरील चहासुद्धा प्यावा लागत आहे. 20 तारखेला मागणी मान्य नाही झाली तर बिचुकले नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.