OBC Reservation : ओबीसीला आरक्षण नाही मिळालं तर अनेक पिढ्या बरबाद होतील - प्रीतम मुंडे
OBC Reservation : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं नाही, असं म्हणत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.
Pritam Munde : राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाविना होणार असल्याने बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं नाही, असं म्हणत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर प्रीतम मुंडे यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली.
ओबीसीला जर आरक्षण नाही मिळालं तर अनेक पिढ्या बरबाद होतील, असा टोला खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर लगावला आहे. मध्यप्रदेशने ओबीसी आरक्षणावर तोडगा काढला ही त्यांची इच्छा होती. मात्र ओबीसीला आरक्षण मिळू नये, ही महाराष्ट्राच्या सरकारची इच्छा आहे. ओबीसीला जर आरक्षण नाही मिळालं तर अनेक पिढ्या बरबाद होऊ शकतात, त्यामुळे सरकारने ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जलद गतीने काम केले पाहिजे असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपचा तरी सरकार असलं तरी त्यांना आरक्षणाच्या संदर्भात केंद्राकडून कुठलीही मदत मिळालेली नाही, त्यांनी आपली कार्यतत्परता दाखवून हे आरक्षण मिळवल आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याचा मागासवर्गीय आयोग नेमण्यासाठी उशीर केला, त्यांना जो निधी हवा होता तो लवकर दिला नाही त्यामुळे आरक्षण हातचं निघून गेलं, असे त्या म्हणाल्या.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागू नयेत तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत, अशी आमची मागणी असून निवडणूक आयोग पावसाचा विचार करून निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा देखील विचार करून त्यांनी निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी देखील मागणी प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवता आपली जबाबदारी पार पाडावी, असे देखील त्या म्हणाल्या आहेत
राजकारणामध्ये सगळ्यांना एकच न्याय असावा
ओबीसी समाजाने फक्त मतदान करून इतरांना खुर्च्यावर बसवायचं का? प्रत्येकाला आपल्या समाजाचा मागासलेपणा घालण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता असून त्यामुळे त्यांना ते मिळालं पाहिजे राजकारणामध्ये सगळ्यांना एकच न्याय असावा अशी परिस्थिती सध्याच्या राजकारणामध्ये नसल्याचंही प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.