राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सहकुटुंब सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट
राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी यांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. त्यांच्या मुलीनेही चरखा चालवला. राष्ट्रपतींनी आश्रम परिसराची पाहणी करत जास्तीत जास्त माहिती जाणून घेतली.
वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. शनिवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचं सेवाग्राम आश्रमाला आगमन झालं. यावेळी राष्ट्रपतींनी अंबर चरखा चालवत सूतकताई केली.
आश्रम प्रतिष्ठानच्या वतीन राष्ट्रपतींच स्वागतं करण्यात आलं. सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट राष्ट्रपतींनी भेट दिली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्यासह त्यांच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी यांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. त्यांच्या मुलीनेही चरखा चालवला. राष्ट्रपतींनी आश्रम परिसराची पाहणी करत जास्तीत जास्त माहिती जाणून घेतली. राष्ट्रपतींनी खादी निर्मिती केंद्राची पाहणी केली, तसेच पैसे देऊन खादी खरेदी केली. यावेळी त्यांनी प्रार्थनादेखील केली.
राष्ट्रपतींच्या हस्ते चंदनाचं वृक्षारोपण करण्यात आलं. राष्ट्रपतींनी आश्रमाला 150 वर्षे सेलिब्रिटी द महात्मा या पुस्तकाच्या हिंदी, इंग्रजी अशा दोन प्रति भेट दिल्या. राष्ट्रपती नियोजित कार्यक्रमाच्या 15 मिनिट जास्त आश्रमात थांबले.
आश्रमाच्या वतीने राष्ट्रपतींना चरख्यातून होणाऱ्या उद्योग निर्मितीची माहिती दिली. राष्ट्रपतींनी पुन्हा आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली. अभिप्राय पुस्तिकेत अभिप्रायही नोंदविला.