अमेरिकेत बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोधमोहीम थांबली, मृत्यू झाल्याची शक्यता, ग्लॅशियर नॅशनल पार्कची पत्रकातून माहिती
मेरिकेतील ग्लॅशियर राष्ट्रीय उद्यानात (Glacier National Park) बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटील याची शोधमोहीम थांबली आहे.सिध्दांत पाटील (Siddhant Patil) याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता गृहीत धरली आहे.
Siddhant Patil News : अमेरिकेतील ग्लॅशियर राष्ट्रीय उद्यानात (Glacier National Park) बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटील याची शोधमोहीम थांबली आहे.सिध्दांत पाटील (Siddhant Patil) याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता गृहीत धरली असल्याचे ग्लॅशियर नॅशनल पार्कने आपल्या पत्रकात म्हटले आहे. मूळचा महाराष्ट्रातील असलेल्ला सिद्धांत विठ्ठल पाटील 26 वर्षीय तरुण अमेरिकेत खासगी क्षेत्रात यशस्वीपणे नोकरी करत होता. मात्र, अमेरिकेतील ग्लॅशियर राष्ट्रीय उद्यानात मित्रांसोबत फिरायला गेलेला असताना 6 जुलै रोजी सिद्धांत दरीत पडला होता.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर सिद्धांतचा शोध घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय उद्यानात करण्यात आला. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पत्रही लिहिले होते. सिद्धांत पाटील याचे वडील मे महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागातून निवृत्त झाले आहेत.
अमेरिकेतील एका छोट्याशा नदीत चेहरा धुण्यासाठी तो वाकला होता. त्यामुळं तो पाय घसरून पडला, अशी माहिती सिद्धांत सोबतच्या मुलांनी पालकांना दिली होती. आपला मुलगा सापडणार की नाही तसेच त्याची काही खबरबात मिळावी यासाठी मुलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यातले पाणी थांबत नाही. मुलाच्या शोधासाठी पालकांनी या मुलाचा शोध घ्या, असे पत्र शरद पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलं होते. सिद्धांत त्यांच्या मित्रांसह ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये गेला होता. तो हिमस्खलन तलावाच्या पायवाटेवर घाटाच्या वर चढत होता. तिथे तो एका मोठ्या खडकावरून हिमस्खलन खाडीत पडल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी सिद्धांतला वाहून जाताना पाहिले. यानंतर हेलिकॉप्टरने त्याचा हवाई शोध घेतला. परंतु अधिकाऱ्यांना सिद्धांतचा मृतदेह सापडला नाही.
सिद्धांत पाटील कॅलिफोर्नियात करत होता नोकरी
सिद्धांत पाटील हा कॅलिफोर्नियामध्ये राहून नोकरी करत होता. तो मित्रांसोबत सुट्टी असल्याने फिरण्यास गेला होता. तेव्हा ही त्याच्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पार्क कॅम्पग्राउंड कर्मचारी जवळजवळ तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सकाळी 9 वाजता रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर सिद्धांत पाटील याची शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. मात्र, अखेर सिद्धांत पाटील याची शोधमोहिम थांबवली आहे. सिद्धांत पाटीलचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ग्लॅशियर नॅशनल पार्कने एक पत्रक काढलं आहे, यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बेपत्ता आजींचा मृतदेह सापडला; दोन दिवसांपासून झाडाखाली दबल्या, पण कुणालाच थांगपत्ता नाही