'लालबाग राजा'च्या दरबारात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की
'लालबाग राजा'च्या परिसरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून माध्यम प्रतिनिधींना अरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे
मुंबई : लालबागचा राजा मंडप परिसर हे कायमच चर्चेत असते. गणोशोत्सवादरम्यान कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला कायमच पाहायला मिळते. लालबाग राजा'च्या परिसरात आज वार्तांकनासाठी गेलेल्या एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.
'लालबाग राजा'च्या परिसरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून माध्यम प्रतिनिधींना अरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना निकम यांनी धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं सांगितलं. त्यावेळी या निकम यांनी "हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब" अशी गुंडगिरीची भाषा वापरली. निकम यांनी मास्क न घालता माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की केली आहे.
काय आहे प्रकरण?
लालबागच्या राजाचे वार्तांकण करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडे पत्रकारांकडे असणारे लालबागच्या राजाच्या मंडळाने दिलेले प्रवेशाचे अधिकृक पास असताना देखील निकम यांनी मंडपामध्ये जाण्यापासून रोखलं. आपण पत्रकार आहोत आणि वार्तांकन करत आहोत हे सांगितलं आणि ओळखपत्र दाखवलं तरीही पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि अरेरावीची भाषाही वापरली. या वेळी प्रतिनिधींनी हात लावू नका असं देखील बजावलं. त्यावेळी अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो अशी गुंडागिरीची भाषा केली आहे. पोलिसांकडून या वेळी कोविड नियमांचं उल्लंघनही झालं. मास्क न घालता संजय निकम यांनी धक्काबुक्की केली.
एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांची प्रतिक्रिया
लालबागच्या कव्हरेजसाठी आम्ही सगळ्यानी नियमानुसार पास काढले होते. पण पास असूनही सकाळपासून पोलिसांनी आत जाण्याची परवानगी दिली नाही . तरीही आम्ही अधिकाऱ्यांशी विनंती करून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होतो. महिला पत्रकारांना देखील या उद्धट वागणूक देण्यात आली आहे. पास असून देखील अडवण्यात आले. पोलिसांकडून अक्षरश: गुंडागिरी केली जात आहे, असे अभिषेक मुठाळ म्हणाले. जेव्हा दादर परिसरात गर्दी होते. कोरोना नियम अक्षरश: पायंदळी तुडवले जातात त्यावेळी मुंबई पोलिस शांत का असतात ? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या अरेरावीमुळे संपूर्ण मुंबई पोलिस बदनाम होत असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले.
घडलेल्या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याशी संवाद साधण्याचा आमच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. मात्र त्यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.