एक्स्प्लोर
वाळू माफियांना पकडायला गेलेल्या पोलिसांनी चक्क पकडली वाळू वाहतूक करणारी 43 गाढवं, पोलीस स्टेशन बनले कोंडवाडा
पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीच्या प्रत्येक घाटावरून वाळू माफिया गाढवावरून वाळू तस्करीचा व्यवसाय करत असतात. याबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्यावर हे माफिया वाळू आणि गाढवे सोडून पाण्यातून पळून जात असल्याने पोलिसांना हाती काहीच लागत नसे.
पंढरपूर : चंद्रभागेचे वाळवंट ओसाड बनवणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून आज वाळू चोरी करत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क 43 गाढवांना ताब्यात घेतले आहे. तसेच यावेळी पोलिसांनी 4 दुचाकी देखील जप्त केल्या आहेत.
पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीच्या प्रत्येक घाटावरून वाळू माफिया गाढवावरून वाळू तस्करीचा व्यवसाय करत असतात. याबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्यावर हे माफिया वाळू आणि गाढवे सोडून पाण्यातून पळून जात असल्याने पोलिसांना हाती काहीच लागत नसे. आता मात्र पोलिसांनी या बेकायदा वाळू वाहतुकीचे मुख्य साधन असलेली गाढवंच जप्त करण्यास सुरुवात केली आहे. आज नगरपालिका पाणीपुरवठा केंद्राजवळ टाकलेल्या छाप्यात 43 गाढवे आणि 3 ब्रास वाळू पोलिसांना मिळाली आहे. पोलीस येताना दिसताच वाळू माफिया पाण्यात उड्या टाकून पळून गेले असले तरी 43 गाढवांसोबत त्यांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या या दुचाकींमधील 2 दुचाकी चोरीच्या असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी चक्क गाढवे जप्त केली असली तरी आता आज दिवसभर या गाढवांना चारा पाणी देण्याची वेळ पोलिसांवर आली होती. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ही सगळी गाढवं दिवसभर आणून ठेवल्याने पोलीस स्टेशनला कोंडवाड्याचे स्वरूप आले होते. थोड्या-थोड्या वेळाने पोलीस कर्मचारी या गाढवांना चारा टाकायचे काम करत होते. आता या गाढवांना प्राणीमित्र संघटनेच्या ताब्यात देण्याचा निर्णय पोलिसांनी न्यायालयाच्या सूचनेनुसार घेतला असला तरी आज दिवसभर पोलीस ठाण्यात या गाढवांचे आदरातिथ्य सुरु असल्याचे मजेशीर चित्र पाहायला मिळत होते.
या गाढवांच्या अज्ञात मालकांवर आता बेकायदा वाळू चोरीसोबत मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराची कलमे लावल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. पंढरपूर शहरात 5 हजारापेक्षा जास्त गाढवांचा वापर वाळू माफियांकडून वाळू उपशासाठी आणि वाहतुकीसाठी केला जातो. एक गाढव मालकाला दिवसभरात 5 ते 10 हजार रुपयाचा व्यवसाय करून देते. आता या बेकायदा व्यवसायावर टाच आणण्यासाठी शहरातील गाढवे पकडून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलीस हाती घेणार आहेत. यापूर्वी 4 वर्षापूर्वी गाढवांच्या वाळू चोरीचे वास्तव दाखवल्यावर तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी गाढवांवर कारवाई करायला लावली होती आणि याचे पडसाद विधानसभेत उमटले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement