PM Modi Cabinet : नारायण राणेंना लघु व मध्यम उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी
केंद्रीय कॅबिनेटमध्ये नारायण राणे यांना कुठलं खातं मिळते याची उत्सुकता सगळ्यांना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये नारायण राणे यांना कुठलं खातं मिळते याची उत्सुकता सगळ्यांना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले.
नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय मिळेल अशी चर्चा होती परंतु राणेंकडे आता मध्यम आणि लघु उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री, भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री तर कपिल पाटिल यांच्याकेडे पंचायत राज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
"वरिष्ठ देतील ती जबाबदारी सांभळण्यास मी तयार आहे. माझा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास दोन मिनिटांत सांगणे सोपं नाही. मी आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार," अशा भावना नारायण राणेंनी शपथविधीनंतर व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे
- राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
- अमित शाह- सहकार, गृह मंत्रालय
- नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग
- निर्मला सीतारमण - केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
- नरेंद्र सिंह तोमर - कृषी व शेतकरी कल्याण
- मनसुख मांडवीया - केंद्रीय आरोग्य मंत्रिपद, रसायन आणि खते विभाग
- स्मृती इराणी - महिला, बालविकास मंत्रिपद
- धर्मेंद्र प्रधान -केंद्रीय शिक्षणमंत्री
- पीयूष गोयल - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद
- अश्विनी वैष्णव - केंद्रीय रेल्वेमंत्री
- हरदीपसिंह पुरी - पेट्रोलियम मंत्रिपद
- ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण मंत्रालय
- पुरुषोत्तम रुपाला - दुग्धविकास, मत्स्योत्पादन खातं
- अनुराग ठाकूर - केंद्रीय क्रीडामंत्री
- पशुपती पारस -अन्न प्रक्रिया मंत्रालय
- गिरीराज सिंह - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय
- भुपेंद्र यादव - केंद्रीय कामगार मंत्रालय
- आर के सिंह - केंद्रीय ऊर्जामंत्री
- किरण रिजिजू - केंद्रीय कायदेमंत्री