Wardha : वर्धा जिल्ह्यातील पिंपळगावाला वादळाचा तडाखा, रस्त्यावर झाडं कोसळली, शेतकऱ्यांचे नुकसान
वादळ वाऱ्याचा गावातील शेतकऱ्यांना फटका मोठा फटका बसला आहे. या गावातील 15 गोठान आणि 8 घरांची छत उडाली आहेत.
वर्धा: जिल्ह्यात तीन दिवसांपासून विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. यात वादळवाऱ्याचा सर्वात जास्त फटका हा समुद्रपूर तालुक्यातील पिंपळगावाला बसला असून घरं आणि पत्र्यांच्या घरांचं मोठं नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री समुद्रपूर तालुक्यातील पिंपळगावात मान्सून पूर्व पावसासह वादळवाऱ्याने मोठा तांडव घातला. यात गिरड कोरा मार्गावरील पिपरी भागात रस्त्यावर झाडं कोसळली. तर
बुधवारी रात्री अचानक आलेल्या पावसासह वादळाने पिंपळगावाला चांगलंच झोडपले. पिंपळगावातील तब्बल 15 जनावरांच्या गोठ्याचे आणि 8 घरांची टीनाचे छपरे उडल्याने शेतकऱ्यांचे, गरिबांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेळ्याही दबल्या छताखाली
पिंपळ गावात वादळाच्या तडाख्यात माणसांची धावपळ झाली आणि कसंबसं स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, मुक्या जनावरांना मोठा त्रास सहन करावा लागला. गावात जोरदार वादळ सुटल्याने टिन पत्र्यांच्या आणि घरांचे नुकसान झाले. सोबतच गोठ्यामध्ये बांधून असलेल्या शेळ्याही छताखाली दबल्या गेल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती.
अनेकांच्या घरावरील छत उडाले, भिंती कोसळल्या
हनुमान मंदिरालगत शिवदास सडमाके यांच्या घरावर वडाच्या झाडांची फांदी कोसळली. यावेळी त्यांच्या घरातील सदस्य सुदैवाने बचावले. मात्र घराच्या छताचे नुकसान झाले. छत कोसळल्याने जीवनपयोगी साहित्याची नासाडी झाली. तर अशोक घोडाम यांच्या घराचे छत कोसळून घरात बांधून असलेल्या शेळ्या छताखाली दबल्या. बाबाराव देवतळे यांच्या सिमेंट घराचा छत जुन्या कवेलू घरावर कोसल्याने पूर्णतः घर जमीनदोस्त झाले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. सुरेश किन्नाके, हनुमान धोटे यांच्या घराच्या भिंती वादळाने कोसळल्या. आनंद कुटे आणि भारताबाई गुरनुले यांच्या घराची टीनाचे छत उडाले.
झोपडपट्टी परिसरातील भीमराव तेलंग, केशव भगत, गणेश घुमडे, मधुकर कुटे, रमेश कुटे, आनंद कुटे, दीपक भगत, प्रमोद धोटे, महादेव कुटे उमेश कोरेकर यांच्या जानावरांच्या गोठ्याचे छत उडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोठे नुकसान सोसावे लागले आहे.