(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price | पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीनं गाढला 25 महिन्यांतील उच्चांक
इंधनाच्या या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक महाग इंधनविक्री करणारं राज्य ठरत आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. तर डिझेलच्या दरानं 80 चा टप्पा ओलांडला आहे. मागील 10 महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच प्रतिलीटर 14 रुपयांची वाढ झाली आहे.
सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचं हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक महाग इंधनविक्री करणारं राज्य ठरत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल्या दरांत गुरुवारी वाढ केली. ज्यामुळं डिझेलचे दर 26-29 पैशांनी आणि पेट्रोलचे दर 21-24 पैशांनी वाढले. देशातील काही मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे आकडे पाहिले तर ते प्रतिलीटरमागे खालीलप्रमाणं असल्याचं आढळून येतं.
दिल्ली - डिझेल 74.38 रुपये, पेट्रोल 84.20 रुपये कोलकाता - डिझेल 77.97 रुपये, पेट्रोल 85.68 रुपये मुंबई - डिझेल 81.07 रुपये, पेट्रोल 90.83 रुपये चेन्नई- डिझेल 79.72 रुपये, पेट्रोल 86.96 रुपये
जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळवता येऊ शकते. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. याची माहिती तुम्हाला आयओसीएलच्या संकेतस्थळावर उपबल्ध होईल.