(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC Crime News : बिल्डरला तीन भागीदारांनी लावला 11 कोटींचा चुना; पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवडमध्ये एक बांधकाम व्यावसायिकाला त्याच्याच तीन भागीदारांनी चुना लावलाय. हा चुना थोडाथोडका नसून तब्बल 11 कोटी 23 लाखांचा आहे.
पिंपरी-चिंचवड, पुणे : आजवर बिल्डरांनी असंख्य (PCMC News) ग्राहक आणि रहिवाश्यांची फसवणूक केल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल किंबहुना तुम्ही ही त्यांच्या जाळ्यात फसला असेल. पिंपरी चिंचवडमध्ये एक बांधकाम व्यावसायिकाला त्याच्याच तीन भागीदारांनी चुना लावलाय. हा चुना थोडाथोडका नसून तब्बल 11 कोटी 23 लाखांचा आहे. याबाबत प्रदीप कर्णावट यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जळगावच्या प्रमोद रायसोनी, प्रशांत संघवी आणि संदेश चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
भोसरी एमआयडीसी परिसरातील सेक्टर नंबर अकरा मधील प्लॉट नंबर 1 मध्ये या चौघांनी मिळून कमर्शियल प्रकल्प सुरू केला. त्यातीलच दुकानं आणि ऑफिस मिळून 64 मिळकती स्पेक्ट्रम रिऍलिटीच्या नावावर करण्यात आली. ही कंपनी रायसोनी, संघवी आणि चोपडा यांच्या भागीदारीत आहे, असा आरोप कर्णावट यांनी फिर्यादीत केला आहे. याच 64 मिळकतींद्वारे कर्णावट यांना या तिघांनी 11 कोटी 23 लाखांचा चुना लावलाय.
कर्णावट, रायसोनी, संघवी आणि चोपडा या चौघांनी 2005 साली भागीदारी केली आणि भोसरी एमआयडीसीच्या सेक्टर नंबर अकरामधील प्लॉट नंबर एक ही जागा पी-3 डेव्हलपर्सच्या नावाने खरेदी केली. एक स्वतंत्र बँक खातं ही उघडण्यात आलं. भागीदारीच्या करारात प्रत्येकी पंचवीस टक्क्यांच्या नफा आणि तोटा असा वाटा ठरला.
या पुढचे सगळे व्यवहार कर्णावट यांनी पाहावे यासाठी कुलमुखत्यार पत्र करण्यात आलं. रायसोनी, संघवी आणि चोपडा यांनी खरेदी-विक्री सह सर्व अधिकार कर्णावट यांना दिले. 18 फेब्रुवारी 2009मध्ये प्लॉट नंबर एक मधील 4 हजार 400 चौरस मीटर जागा विकसित करायचं ठरलं. यासाठी पीसीएनटीडीए कडून 99 वर्षाचा लीज घेण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर प्रसन्न गोल्डफिल्ड्स नावाने 2010 साली कमर्शियल प्रकल्प सुरू करण्यात आला. यात दुकानं, ऑफिस आणि गोडाऊन अशी एकूण 220 मिळकती उभारायला सुरुवात झाली. 2019मध्ये 90 टक्के काम पूर्ण झालं.
अवघे 25 ते 30 मिळकतीचं काम प्रतीक्षेत होतं. त्यानंतर पुण्यात एक बैठक झाली. तेव्हा रायसोनी, संघवी आणि चोपडा हे आम्ही आमचं पाहून घेऊ, असं म्हणू लागले. अशातच 23 मे 2023 ला अचानक 11 कोटी 23 लाख किमतीच्या 64 मिळकतींची विक्री झाली. स्पेक्ट्रम रीऍलिटीच्याच नावाने सगळ्या मिळकती झाल्या. मात्र पी 3 डेव्हलपर्सच्या खात्यात रक्कमचं जमा झाली नाही. त्यामुळं कर्णावट यांना फसवणूक झाल्याचा संशय बळावला. त्यानुसार 10 जून 2023ला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंकडे त्यांनी तक्रारी अर्ज दिला. आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देताच, तपासाची चक्र फिरली. 23 मे 2023ला झालेला गैरव्यवहार उघडकीस आला. त्यानंतर रायसोनी, संघवी आणि चोपडा यांच्यावर भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अद्याप अटक मात्र झालेली नाही.