Parshuram Ghat : परशुराम घाटातील वाहतूक आजपासून 24 तास सुरू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Parshuram Ghat : परशुराम घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आता पावसाचा जोर कमी झाल्यावर घाटातील वाहतूक ठरावीक वेळेत सुरु झाली.
रत्नागिरी : परशुराम घाटातील (Parshuram Ghat) वाहतूक उद्यापासून 24 तास सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. पावसाळाच्या सुरुवातीला घाटातील दरड खाली आल्याने आणि घाटातील काम अर्धवट असल्याने ठराविक वेळेत वाहतूक सुरु होती. परंतु आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने घाट 24 तास खुला करण्यात आला आहे,
गेल्या महिन्यात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवाशांसाठी डोकेदुखी बनला होता. पावसाच्या सुरुवातीलाच घाटातील दरड महामार्गावर आल्याने घाट आठवडाभर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर घाटातील वाहतूक ठरावीक वेळेत सुरु झाली. पण पावसाचा जोर वाढला तर घाट वाहतूकीसाठी बंद होऊ शकतो. आज स्थानिक राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने घाटाची पाहाणी करून वाहतूक पुन्हां सुरु केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा आहे. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला त्यामुळे परशुराम घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुरू आहे. तसेच आवश्यक तेथे संरक्षण भींत उभारणे ही कामे सुरू आहेत.
परशुराम घाटमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता हवामानाची स्थिती, पर्जन्यवृष्टीचे प्रमाण व दरड कोसळण्याची शक्यता आणि स्थानिक वस्तुस्थिती यांचा विचार करून प्रवासी वाहतुक सुरु करण्यात यावी अशा पध्दतीची मागणी करण्यात आली होती. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला असून आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याचा ओघ सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत कोकणवासीयांना मोठाच दिलासा दिला आहे.