एक्स्प्लोर
हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाचा सेल्फी : पंकजा मुंडे

मुंबई : हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सेल्फी काढला. काही उथळ लोकांनी त्याचं राजकारण केलं, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी वादावर दिलं आहे. लातूर जिल्ह्यातील केसाई गावात भीषण दुष्काळामुळे मांजरा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलं आहे. याठिकाणी गाळ काढण्याचं काम सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे लातूरला गेल्या होत्या. त्यावेळी बॅकग्राऊंडला गाळ काढण्याचं काम सुरु असताना पंकजांनी सेल्फी काढला. तसंच सोबत असलेल्या अधिकाऱ्यांसोबतही पंकजांनी त्यांच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढला.
पंकजा मुंडेंच्या 'दुष्काळ सेल्फी'वर विरोधकांची टीका
मात्र यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राज्यात भीषण दुष्काळ असताना पंकजा मुंडे फोटोसेशन करण्याची असंवेदनशीलता कशी दाखवतात? असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, काही लोकांनी तर माझा मेकअप खराब झाल्याचं म्हटलं आहे. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जीव घेण्याचा हा प्रयत्न आहे. पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण लातूरच्या दौऱ्यात अनेक वेळा पाणी टंचाईच्या बैठका घेतल्या. चर खोदून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. अनेक ठिकाणी पाणी मिळण्यात अपयश आले. रविवारी लातूर दौऱ्यात साई बंधारा, मांजरा नदीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना ट्रेंच मध्ये पाणी बघून थोडसं समाधान वाटलं. मी आनंदाने ( जे मी कधी एरवी करत नाही ) कामाचे फोटो व रेकाॅर्डिंग स्वतः केले. वाळवंटात ओअॅसिस दिसावे एवढा आनंद मला पाणी पाहून झाला. हा फोटो कुठल्या समारंभाचा किंवा महोत्सवाचा प्रसंगी काढलेला नाही. काही उथळ लोकांनी याला वेगळे वळण दिले. इतपत लिहिले की, मी माझा मेक अप खराब झाल्याचे म्हटले. अरे अरे, मी याबद्दल काय बोलू? कळत नाही. इतक खोटं, इतक मेड अप करून एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जीव घेण्याचा हा प्रयत्न! त्याची शिक्षा काय? कोणाचं भलं करणार आहे, अशा खमंग वार्ता... दुष्काळग्रस्तांचं, शेतकऱ्यांचं की कोणाचं? हा फोटो 45 डिग्री उन्हात माझ्या विभागाच्या कामाचं अवलोकन करताना काढला. त्यात excitement नव्हती, समाधान होतं ! खरं सात्विक जगासमोर यावं. चमचमीत खमंग रोज सहन होत नाही, बनवणा-यांना आणि पचवणा-यांनाही!आणखी वाचा























