CoronaVirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठुराया पु्न्हा कुलूपबंद, आज सायंकाळपासून मंदिर भाविकांसाठी बंद
येत्या 13 एप्रिल रोजी गुढीपाडवा देखील देवाला भाविकांविना साजरा करावा लागणार असून नवीन मराठी वर्षाचा आरंभ याही वर्षी भाविकांना विठुरायाच्या दर्शनाविनाच करावा लागणार आहे.

पंढरपूर : कोरोनाचे संकट पुन्हा वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लागू केले आणि त्यानुसार पुन्हा मंदिरे बंद करण्याचा निर्णय झाला. यानुसार आज (5 मार्च) सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 30 एप्रिल पर्यंत विठुराया पुन्हा भाविकांसाठी कुलूपबंद होणार असून देवाचे नित्योपचार मात्र नियमितपणे सुरु राहणार आहेत .
आज शेवटच्या दिवशी देवाचे दर्शन मिळावे याकरता ऑनलाईन बुकिंग करून भाविक दर्शन रांगेत आले असून सायंकाळी सात वाजता मंदिराला कुलुपे घातली जाणार आहेत. येत्या 13 एप्रिल रोजी गुढीपाडवा देखील देवाला भाविकांविना साजरा करावा लागणार असून नवीन मराठी वर्षाचा आरंभ याही वर्षी भाविकांना विठुरायाच्या दर्शनाविनाच करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्बंधानंतर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी इतर सदस्यांशी चर्चा करून आज सायंकाळ पासून मंदिर भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
आता कोरोनाचे संकट वेळीच कमी नाही झाले तर गेल्यावर्षी प्रमाणे हे निर्बंध अजून किती दिवस वाढणार याची चिंता भाविकांना लागली असून तोपर्यंत भक्ताला देवाचा आणि देवाला भक्तांचा विरह सहन करावा लागणार आहे .
कोरोनामुळे विठुरायाचे उत्पन्नात दसपट घट, तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका
कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत येत असताना याचा थेट फटका मंदिरांनाही बसला आहे. या वर्षात विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात दसपट घट होत 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशात कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर बंद करण्यात आले होते. यानंतर ते थेट दिवाळी पाडव्याला म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी उघडले. मात्र, अतिशय मोजक्या भाविकांना ऑनलाईन दर्शन व्यवस्थेनुसार दर्शन देण्यास सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी ऑनलाईन सोबत थेट आलेल्या भाविकांनाही कोरोनाचे नियम पाळत दर्शनाला सोडण्याची व्यवस्था सुरु झाली आणि कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आल्याने भाविकांची संख्या कमालीची रोडावली आहे. गेल्या वर्षी विठ्ठल मंदिराचे उत्पन्न 31 कोटी 20 लाख रुपये इतके होते. यंदा मात्र ते केवळ 4 कोटी 60 लाख इतकेच झाल्याने जवळपास 27 कोटी रुपयांची घट झाली आहे.























