(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाच्या चरणावर माथा; थेट दर्शन आजपासून सुरु
Pandharpur Vitthal Mandir Gudi Padwa : कोरोनामुळं गेल्या काही काळापासून बंद असलेलं विठुरायाचं थेट दर्शन आजपासून सुरु होतंय. भाविक आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे.
Pandharpur Vitthal Mandir Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने विठुराया आणि भक्तांचे अंतर संपवले आहे. विठ्ठल भक्तांसह शेकडो लहानमोठ्या व्यापाऱ्यांना विठ्ठल पावला आहे. कोरोनामुळं गेल्या काही काळापासून बंद असलेलं थेट दर्शन आजपासून सुरु होतंय. भाविक आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे. या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे.
गेले दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विठुरायाचे बंद असलेले पायावरील दर्शन व्यवस्था आज गुढी पाडव्यापासून सुरु झाली असून भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अंतर संपले आहे. आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठुरायाच्या चरणावर दर्शन घेणाऱ्या पहिल्या भाविकांच्या अंगावर पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.
ठाकरे सरकारने लाखो विठ्ठल भक्तांना निर्बंध मुक्तीची मोठी भेट दिल्याने आज सकाळी सहापासून विठ्ठल भक्तांना आपले मस्तक थेट विठुरायाच्या चरणावर ठेऊन दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. आजच्या निर्बंधमुक्तीमध्ये आता मंदिरात देवाला प्रिय असणारा तुळशी हार आणि प्रसाद देखील नेता येत असल्याने शेकडो लहान व्यापाऱ्यांची उपासमार बंद झाली आहे.
आज गुढी पाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात पुणे येथील विठ्ठल भक्त नाना मोरे आणि नवनाथ मोरे यांनी फुलांची व फळांची आकर्षक सजावट सेवा दिली आहे. विठ्ठल गाभारा , रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळाखांबी या ठिकाणी झेंडू , जरबेरा , शेवंती , गुलछडी , ऑर्किड , ग्लायोऊड , गुलाब , तगर अशा विविध रंगी सुगंधी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत 1100 किलो फळे आणि 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. आज गुढी पाडव्याला या प्रसन्न वातावरणात भाविकांना विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवण्याचा आनंद घेता येत आहे.
देशात कोरोनाचे संकट सुरु झाले आणि 17 मार्च 2020 पासून विठ्ठल मंदिर बंद झाले होते . यानंतर मंदिर खुले झाले तरी निर्बंधामुळे विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागत होते . आता कोरोनाचे संकट संपत असताना ठाकरे सरकारने गुढी पाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर निर्बंध मुक्तीची गुढी उभारल्याने विठ्ठलभक्त आणि विठुराया यांच्यातील दुरावा संपला आहे . कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे संपले नसल्याने विठ्ठल भक्तांना खबरदारी म्हणून मंदिरात येताना तोंडावर मास्क लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha