Palghar News :  एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे एका गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जुळ्या बालकांना प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. राज्य विधिमंडळातही या घटनेवरून मोठा गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले होते. तसेच हायकोर्टानं देखील या घटनेची दखल घेतली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ठाणे बांधकाम विभागाचे अधीक्षक विलास कांबळे यांनी रस्त्याची पाहणी करून अखेर या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. एबीपी माझाने या घटनेचे वास्तव घटनास्थळावरून थेट दाखवलं होतं. तसेच हे वृत्त सर्वप्रथम प्रसिध्द करुन या घटनेचा सातत्याने पाठपुरावा केला होता.


नेमकं काय घडलं होतं...
वंदना यशवंत बुधर या सात महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या होत्या. यावेळी कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला. आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली. तिने 108 अॅम्बुलन्स सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मरकटवाडीला गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता.  दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या, तिची प्रसूती घरातच झाली. तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला. मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते. त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करणे आवश्यक होते.  काही वेळातच उपचाराअभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडले होते. दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत गेल्याने तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले. तिथून तिला अॅम्बुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले होते. 


परंतु या घटनेने मरकटवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला. याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीरतेने दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले. त्या अनुषंगाने बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांनी 27 तारखेला शनिवारी मरकटवाडीला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी आठ दिवसात या रस्त्याची शासकीय प्रकिया पूर्ण करून 4 कोटी 15 लाखाच्या कामाला मंजुरी दिली जाणार असून तीन महिन्यात काम पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.  मरकटवाडीच्या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असून यामुळे ग्रामस्थांनी देखील आभार व्यक्त केले आहेत.


विधिमंडळात गाजलं प्रकरण, हायकोर्टानंही घेतली दखल


पालघर जिल्ह्यातील महिलेच्या जुळ्या बालकांचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर विधिमंडळात देखील यावरुन गदारोळ झाला होता. तसेचरी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर घेतली होती. कुपोषणामुळे बालकांचे होणारे मृत्यू, गर्भवती महिला आणि स्तनदा माता दगावण्याची संख्या काही केल्या कमी होत नसल्याबद्दल हायकोर्टानं चिंता व्यक्त केली.


इतर महत्वाच्या बातम्या


Palghar News : दवाखाना गाठण्यासाठी गर्भवतीची डोलीतून पायपीट, आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू


Palghar Rains : नाल्याला पूर, पुलावरुन पाणी; प्रसंगावधान दाखवून रुग्णवाहिका चालकाने गरोदर मातेला सुखरुप आरोग्य केंद्रात पोहोचवलं!