Pune Crime News: पुण्याच्या जुन्नर मधील तंटामुक्तीच्या अध्यक्षालाच तडीपार करण्यात आलं आहे. रोहन बेल्हेकर असं त्याचं नाव असून, त्याची बोरी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे. पण त्याला दहा दिवसांसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तडीपार केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील अनेक गुन्हेगारांना तडीपार करावं, असे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यात बोरी गावच्या रोहनचा समावेश होता. 


रोहनवर विनापरवाना शस्त्र बाळगणे, जमावबंदी आणि मारहाण असे तीन गुन्हे दाखल आहेत. तो तालुक्यातील गणेशोत्सवात काहीतरी विघ्न आणेल, अशी शंका पोलिसांना होती. म्हणून नारायणगाव पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला संमती मिळाली अन दहा दिवसांसाठी त्याला तडीपार करण्यात आलं. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना रोहनची वर्णी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी कशी काय लागली? त्याची ही निवड कोणी केली? ग्रामसभेने एकमुखाने याला संमती कशी काय दिली? असे प्रश्न यानिमित्ताने उभे राहिलेले आहेत.


रोहनची ही निवड गेल्या आठवड्यातच झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. पण जेव्हा तो अध्यक्ष झाला तेंव्हा त्याने सोशल मीडियावर फोटोसह ही माहिती शेअर केली अन त्यानंतर त्याला तडीपार करण्यात आलं. पण तो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे हे पोलिसांना समजताच त्यांना ही धक्का बसला.


चौदा जण तडीपार
सनी रमेश तलवार, अक्षय रमेश तलवार (दोघेही राहणार पेठ आळी, नारायणगाव ता. जुन्नर), अजय ऊर्फ सोन्या राठोड (राहणार चौदा नंबर, वडगाव कांदळी ता. जुन्नर), सुशिल ऊर्फ बाळा राजू शिंदे, कृष्णा प्रताप माने, सूरज बाळासाहेब चव्हाण , मोसिन फिरोज इनामदार, (सर्व राहणार इंदिरानगर नारायणगाव, ता. जुन्नर), आवेश आदम आतार, आकाश भाऊ गोफणे (दोघेही राहणार नानूपाटे नगर, नारायणगाव ता. जुन्नर), सलमान अब्दुल रहमान मलिक, साहिल रफिक मुलाणी (दोघेही राहणार पाटे-खैरे मळा, नारायणगाव, ता. जुन्नर), गुरमीत बलवीर सिंग (राहणार कोल्हेमळा नारायणगाव, ता. जुन्नर), रोहन अनिल बेल्हेकर (राहणार बेल्हेकरमळा, ता. जुन्नर), सुजित ऊर्फ गणपत संजय गाडेकर यांना तडीपार करण्यात आलं आहे.


उत्सव शांततेत पार पडण्यासाठी तडीपार
गणेशोत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी करणाऱ्यांना आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा जणांना नऊ दिवसांसाठी जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. चौदाही जणांना त्यासंदर्भात नोटीसा देण्यात आल्या आहे.