Palghar Rains : राज्यभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पूरस्थिती निर्माण झाली आहे. परंतु याच आणीबाणीच्या प्रसंगात पालघरमधल्या एका रुग्णवाहिका चालकाने बऱ्हाणपूर गावातील गरोदर मातेला सुरक्षित प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवलं. 


पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल (13 जुलै) देखली जोरदार पाऊस बरसत होता. सलग सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं होतं. यामध्ये पालघरमधील बऱ्हाणपूर इथल्या नाल्याला मोठा पूर आला होता. थोडा जरी उशीर झाला असता तरी गावाचा संपर्क तुटला असता. 


त्यातच बऱ्हाणपूर वानिपाडा इथल्या गरोदर माता प्रतिभा डोगरकर यांना वेदना सुरु झाल्या होत्या. जननी सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत त्यांना सोमटा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करायचे होते. यावेळी रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान दाखवून मातेला आणि नातेवाईक यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.


चालकाने पाण्याचा अंदाज घेत पूर्ण आत्मविश्वासाने रुग्णवाहिका या पाण्यातून पार केली. याबाबत चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खरंतर पुलावरुन पाणी जात होतं. परंतु चालकाचा आत्मविश्वास दांडगा होता आणि गरोदर मातेला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची जिद्द होती. त्यामुळे मातेला सुखरुप आरोग्य केंद्रात पोहोचवलं.




दरम्यान या महिलेला सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्रात दाखल केल्यानंतर तिला जास्त वेदना होऊ लागल्या म्हणून तिला पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.


पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, वसई, विरारमध्ये सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यातील वसई विरारसह सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजांना आज सुट्टी जाहीर केली आहे. पालघर जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसल यांनी तसे पत्रक काढले आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट असला तरी आज सकाळच्या वेळेत मात्र जिल्ह्यासह वसई, विरार, नालासोपाऱ्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. 


सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
पालघरमधील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धामणी धरण सध्या 79.98 टक्के भरलं असून या धरणातून 12900 क्यूसेक्स पाण्याचा सुर्या नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सुर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून मिळून सुर्या नदीत 48330 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सुर्या नदीला मोठा पूर आला असून सुर्या नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Plaghar Rain Updates : अखेर 15 तासांनी सुखरुप सुटका; पालघरमधील वैतरणेच्या पुरातून 10 कामगारांना वाचवलं