पालघर : देश एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई ठाण्याजवळ असलेल्या पालघरमध्ये आज ही मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय. एका बाजूला याच पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन , मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यातील गावांना जोडणारे मुख्य रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, गरोदर महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा मधील ओसरविरा (मुकुंदपाडा ) येथील दुर्गा भोये या गरोदर महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या. मात्र या गावाला जोडणारा रस्ता आणि दळणवळणाची सोय नसल्याने दवाखान्यात पोहचण्यासाठी तब्बल चार किलोमीटर झोळीतून पायपीट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुकुंदपाडा तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजित 25 किलोमीटरवर असून या गावाच्या तिन्ही बाजूला नदी आहे. गावात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी रस्ता नाही. या गावातील नागरिक नदी पार करून येजा करत असतात. पावसाळ्यात तर कठीणच परिस्थिती असते. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यातील अनेक खेडी अजूनही स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे.
एखाद्या वृद्धाला, महिलेला आजपरपणात आणि महिलेला गरोदरपणात दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन जाणे अवघड जाते. एखाद्या व्यक्तीचा यामध्ये जीव गेल्यास या गोष्टीला प्रशासन ज्याने वैद्यकीय सेवा दिली नाही आणि रस्ते बनवले नाही, ते जबाबदार राहणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जत आहे. पालघरमधील रस्ते अधिक जोखमीचे झाले आहेत. कोणतेही वाहन पावसळ्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने अक्षरश: झोळीमध्ये टाकून प्रवास करावा लागत आहे. या लोकांचे प्रश्न कधी सुटतील? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संबंधित बातम्या :