Palghar ABP Majha Impact : शिक्षणासाठी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना कराव्या लागत असलेल्या संघर्षाची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. त्यानंतर एबीपी माझाच्या बातमीनंतर परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. माझाच्या बातमी नंतर शाळेसाठी पायपीट करत असलेल्या काही विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्यातून काही भागात वाहनांची व्यवस्था झाली खरी, पण तरीही सरकारकडून अजूनही व्यवस्था होत नसल्याचं चित्र आहे. काल (शनिवारी) पुन्हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील सर्व विभागीय एसटी महामंडळाना (ST) आदेश देण्यात आलं असून बस सेवा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
अनिल परबांचं आश्वासन, पण...
एबीपी माझाच्या बातमीची दखल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली होती. एसटी संपामुळे जिथे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अडचण होत आहे. तिथे पर्यायी व्यवस्था देणार असल्याचं अनिल परब म्हणाले होते. एबीपी माझानं आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवला होता. ग्रामीण भागात एसटी संपामुळे विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. माझाच्या या बातमीची दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली होती. पण अद्यापही सरकारकडून कोणतीही व्यवस्था झालेली नाही.
एबीपी माझाच्या बातमीनंतर परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. पालघर तालुक्यातील पाड्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बोर्डाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत अनेक व्यक्तिंनी विद्यार्थ्यांसाठी मोफत गाड्यांची व्यवस्था करुन दिली आहे. पेपरसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी गावात गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे मुलांचा प्रवास सुखकर झाला आहे. पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते तुळशी जोशी, पुण्याच्या कॅफे दुर्गा ब्रँडचे मालक कपिल कुलकर्णी आणि उदय सामंत यांच्या पत्नी जया सामंत यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. पण अद्याप सरकारकडून कोणतीही सोय न झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
एबीपी माझाचं महाराष्ट्राला आवाहन!
या सगळ्या परिस्थितीनंतर एबीपी माझानं महाराष्ट्राला आवाहन केलं आहे की, सध्या महाराष्ट्रात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. नेमक्या याच काळात राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपही सुरु आहे. त्यामुळे राज्यातील गावखेड्यांसह पाड्यांवर राहणाऱ्या हजारो विद्यार्थांना परीक्षेसाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुणाला परीक्षेसाठी पायपीट करावी लागत असेल, तर तुम्ही स्वेच्छेने त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व घ्या. परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांना सेंटरपर्यंत पोहोचवण्यसाठी मदत करा!
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha