मुंबई: आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही असा आक्रमक बाणा उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे उद्या मातोश्रीसमोर काय होणार याची उत्सुकता आहे. 


राणा दाम्पत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. 'मातोश्री'समोर जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. तुम्ही जा घरी, 'मातोश्री' समोर यायची कुणाची हिंमत नाही असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना म्हटलं आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्या, शनिवारी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसाचे पठण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी 600 हून अधिक कार्यकर्ते अमरावतीहून मुंबईला आले आहेत. आजही एक पत्रकार परिषद घेऊन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपली ही भूमिका कायम ठेवली आहे. यावर शिवसेनेकडून आज प्रतिक्रिया उमटली आहे. 


शिवसेनेला डिवचू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांनी दिली असून आज अनेक शिवसैनिक 'मातोश्री' बाहेर जमा झाले आहेत. हे कार्यकर्ते आज रात्रभर त्या ठिकाणीच राहणार असून उद्या राणा दाम्पत्य 'मातोश्री'समोर येणार आहे. 


हनुमान चालिसा पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम


कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असल्याचे सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: