पालघर : पालघर जिल्ह्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. रविवारी (27 मार्च) सुट्टीचा दिवस असल्याने मौजमजा करण्यासाठी पालघर तालुक्यातील सफाळे येथील करवाले डॅमवर नवघर गावातील काही तरुण आले होते. त्यातील प्रविण प्रभाकर पाटील (वय 25 वर्षे) याने पाण्याच्या टाकीवर चढून पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज आला नाही आणि तरुण पाण्यात गेलेला पुन्हा बाहेर आलाच नाही.
प्रविण पाटील हा सफाळे येथील नवघरचा रहिवासी होता. तरुणाचा डॅममध्ये उडी मारतानाचा व्हिडीओ मित्राच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. आज (28 मार्च) सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
केळवे समुद्रात पाच जण बुडाले; एकाला वाचवण्यात यश, चार जणांचा मृत्यू
याआधी मार्च महिन्यातच केळवे बीचवरील समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू झाला. देवीचा पाडा येथील 4-5 स्थानिक अल्पवयीन मुले समुद्रात पोहायला गेली होती. त्याच वेळी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीत ही मुले बुडू लागली. त्याच दरम्यान नाशिक येथील ब्रह्मवेली नामक खाजगी कॉलेजमधील काही विद्यार्थी पोहत होते. त्यांना काही अल्पवयीन मुले समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आलं. यानंतर चार विद्यार्थ्यांनी त्या बुडणाऱ्या मुलांच्या दिशेने झेप घेतली. परंतु यावेळी समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचवण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली. या चारपैकी एकाला वाचवण्यात यश आलं तर स्थानिक मुलासह नाशिकच्या ब्रह्मव्हॅली स्कूलचे तीन विद्यार्थी, अशा एकूण चार जणांचा बुडून मृत्यू झाला.
पालघर हा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध बीचवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. इथल्या समुद्रकिनारी पोहण्यासाठी पाण्यात उतरतात. परंतु योग्य काळजी न घेतल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. मार्च महिन्यात एकूण पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.