औरंगाबाद: राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेचा भाजपकडून घरोघरी प्रचार सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसंच राज ठाकरेंची सभा झाल्यास भोंग्यांवरुन दंगल होण्याची भीती नागरिकांमध्ये असल्याची प्रतिक्रियाही खैरेंनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत विचार करावा, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. 


माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, "औरंगाबादमध्ये भाजपचे लोक राज ठाकरे यांच्या सभेला जाण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. मला अनेक लोक येऊन भेटतात आणि म्हणतात राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा झाली तर भोंग्यावरून दंगल होऊ शकते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सभेला परवानगी देण्याबाबत विचार करावा."


राज ठाकरेंच्या मुंबईतील आणि ठाण्यातील सभेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे जर काढले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. 


महाराष्ट्र दिनी  म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. आता या सभेच्या ठिकाणावरून आता वाद सुरू आहे. 


राज ठाकरेंच्या सभेला वंचित बहुजन आघाडीसह अनेक संघटनांनी विरोध केला आहे. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र या संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. त्यात पोलिसांनी अद्यापही मनसेच्या सभेला परवानगी दिलेली नाही. शिवाय आता सभेचं स्थळ बदलण्याचा सल्लाही दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: