ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर
सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रिया सुरेश वाडकर यांनी दिली आहे.
मुंबई : ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. आपल्या सुरेल आवाजाने भावगीतांसह मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना वाडकरांनी आवाज दिला आहे.
ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है, मेघा रे मेघा रे, चप्पा चप्पा चरखा चले यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. 1981 मध्ये संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या क्रोधी चित्रपटात चल चमेली बाग में, तर प्यासा सावन चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासह मेघा रे मेघा रे ही गाणी त्यांनी गायली.
सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 मध्ये कोल्हापूर येथे झाला. गाण्याची आवड असल्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. पंडित जियालाल वसंत यांच्याकडे त्यांची संगीताचे धडे गिरवले.
सुरेश वाडकर यांना 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याच प्रमाणे त्यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारही मिळाला आहे. 2011 मध्ये सुरेश वाडकरांना मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.