टेम्पोचालकाचा निष्काळजीपणा, दीड वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले, घटना CCTV मध्ये कैद
Titwala Accident News : या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

Titwala Accident News : घराच्या परिसरात खेळणाऱ्या एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला एका टेम्पोने चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळ बल्याणी परिसरात घडली. अरसलान उर्फ बाबू असं या चिमुकल्याचं नाव आहे. या टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणाने दीड वर्षाच्या अरसलानचा जीव घेतला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी (Titwala Police) गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुखि याला अटक केली असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे .
घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद
कल्याण जवळ असलेल्या बल्याणी परिसरात उमर शहा हा आपली पत्नी गुलशन, सात वर्षाचा मुलगा अरिष, 3 वर्षांची मुलगी आयरा आणि दीड वर्षाचा मुलगा अरसलान सोबत राहतात. उमर विक्रोळी येथे कामाला असून 24 तारखेला नेहमी प्रमाणे सकाळी ते कामावर निघून गेले. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमर यांची तिन्ही मुलं घराच्या बाजूला असलेल्या मैदानात टेम्पो शेजारी खेळत होती. याच दरम्यान टेम्पो चालक आला, थेट टेम्पोत बसून टेम्पो पुढे नेला. मात्र या टेम्पोचालकाचा निष्काळजीपणा शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या अरसलानच्या जीवावर बेतला. टेम्पो शेजारी खेळत असलेल्या अरसलान या दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावरून टेम्पोच चाक गेलं व या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान अरसलान याचा मृत्यू झाला .
टेम्पो चालकाला अटक
याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक सैफ फारुखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हे ही वाचा-
- Exam 2022 : पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' महिन्यात होणार; परीक्षा परिषदेने घेतला महत्त्वाचा निर्णय
- मराठी माध्यमांच्या पहिलीच्या अभ्यासक्रमात यंदापासून मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांच्या 'या' मोठ्या घोषणा
- UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी खाण्यासाठी विकत घेतली जाते पण खाल्ली जात नाही? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
























