OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन भुजबळ-बावनकुळेंचे एकमेकांवर गंभीर आरोप - नेमकं काय म्हणाले
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरुन एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरुन एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी काढलेल्या अध्यादेशावर सही न करण्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं. जो डेटा आहे ती कोणाच्या घरची संपत्ती नाही. तो दिला पाहिजे. तो डेटा ठेऊन काय पुजायचा आहे का? असं भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय हा संपूर्ण देशाला लागू आहे म्हणून तुम्ही मोदी यांना भेटा. तुमचं नेतृत्व मान्य करायला आम्ही तयार आहोत, असं मी त्यांना म्हणालो, असं भुजबळांनी सांगितलं.
OBC Reservation साठी भाजपचं आंदोलन, ठिकठिकाणी जेलभरो आणि चक्काजाम!
ते म्हणाले की, अनेक मुद्दे आहेत. छगन भुजबळ कुणाला घाबरत नाही. खूप हातोडे झेलले आहेत. मी पहिला पक्ष सोडला त्यात काय होतं ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. मंडल आयोग लागू करा हीच आमची मागणी आहे. मी फडणवीस किंवा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करत नाही, पण ते दिशाभूल करत आहेत, असं ते म्हणाले. भुजबळ म्हणाले की, आम्हाला इम्पेरियल डेटा द्या त्यातून आरक्षण मिळेल. त्याचं क्रेडिट आम्हाला नको. आम्हाला शिव्या द्या, पण ओबीसी सोबत राहा. मी ओबीसी यांच्यासाठी खूप रट्टे खालले आहेत. पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, मात्र निवडणूक आली की सुरू होतं, हा माळी आहे, हा इतर जातीचा आहे, असं सुरू होतं, असंही भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळांना या वयात खोटं बोलावं लागतं- चंद्रशेखर बावनकुळे
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यावर म्हणाले की, छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, मात्र त्यांना या वयात खोटं बोलावं लागत आहे. आणि रेटून खोटं बोलावे लागत आहे.2018 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा भुजबळ जेलमध्ये होते, आम्ही काम करत होतो, असं बावनकुळे म्हणाले. त्यांनी म्हटलं की, भुजबळ यांच्या अशा बोलण्यावर कीव येत आहे. भुजबळ यांना भेटून त्यांना अध्यादेश पुन्हा रिन्यू करा अशी आठवण करून दिली होती. मात्र आता त्यांच्यावर विषय बूमरेंग झाला आहे, म्हणून ते खोटे बोलत आहे. त्यांनी या वयात तरी खरे बोलले पाहिजे अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.