(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही," जरांगेंच्या दाव्यांनंतर आता लक्ष्मण हाकेही आक्रमक!
ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागातील कुणबी समाजाची उदाहरणेही दिली आहेत.
जालना : नोंदी नसताना अनेकांना ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्यात आलं. आम्हाला बाजूला काढून कायदा करून 16 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे घटनेनं दिलेलं आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करून टाका, अशी भूमिका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केली. त्यांच्या याच भूमिकेनंतर आता ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्य मागासवर्गाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जरांगेंचे दावे खोडले आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षण, त्यामागची भूमिका, आरक्षण कशासाठी आहे, अशी तपशीलवार माहिती दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
कुणबी समाज मराठा समाजापेक्षा वेगळा आहे
"ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट महाराष्ट्रात घातला जात आहे. कुणबी हा प्रवर्ग वेगळा आहे. कुणब्यांचे काही प्रकार आहेत. खान्देशी कुणबी, काळे कुणबी, वऱ्हाडे कुणबी, कोकणी कुणबी, दलेरी कुणबी, खैरे कुणबी, घाटोळी कुणबी, खेडूले कुणबी आहेत. हेच खरे कुणबी आहेत. हे कुणबी मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत. त्यांचे देव वेगळे आहेत. त्यांचा रितीरिवाज वेगळा आहे. त्यांचे सोयरेपण वेगळं आहे. त्यांचे राहणीमान वेगळे आहे. मानववंशशास्त्राप्रमाणे स्वभाव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे कुणबी या एका शब्दाला घेऊन ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या चुकीच्या आहेत," असे हाके म्हणाले.
आरक्षण हा एकमेव पर्याय नाही
"मनोज जरांगे यांना ओबीसी, मंडल आयोग, मंडल आयोग कधी लागू झाला, पहिल्यांदा यात किती जागा होत्या या गोष्टी माहिती नाहीत. मनोज जरांगे काहीही बोलतात. घटनात्मक अधिकार असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने अभ्यास करून एखाद्या जातीचा समावेश करतो. मागासवर्गाला तो अधिकार आहे. मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की, आपली उन्नती करण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय नाही. त्यासाठी अनेक पर्याय आहेत. आपण त्यासाठीच सरकार निवडलं आहे," असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले.
आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
"ST आरक्षणाच्या मागणीची आमची लढाई वेगळी आहे. आता तुम्ही आमच्या ताटातले घेऊ नका. छगन भुजबळ यांच्यावर टीका करून गोंधळवून टाकू नका. मुस्लीम समाजाकडे एक धर्म म्हणून पाहिले जाते. मुस्लिमांमध्ये सामाजिक स्तर नाही. व्यवसाय बघून त्यांना प्रमाणपत्रं दिली गेली आहेत," असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. तसेच जी गोष्ट आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून, असा सवालही हाके यांनी केला.
आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही
"या देशात कायद्याचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. कोणीतरी माणूस उठतो आणि वेठीस धरतो. मला सरकारचा खेद वाटतो. सरकार जरांगे यांना इंटरटेन करतंय. ओबीसी आरक्षणात अशाच जाती घातल्या, ओबीसी असेच आले, त्यांचे कुठले सर्वेक्षण झालेले नाही, त्यांना खिरापत वाटली, त्यांना काही गरज होती का? या पुढे असली मोघम वक्तव्यं महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्याने करू नये," असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. तसेच आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही. आता दहा टक्के दिलेला आरक्षणातील सर्वेक्षण 100 टक्के बोगस आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
हेही वाचा :
"आता सगळं लफडं संगच" मनोज जरांगेंचा नवा एल्गार; मारवाडी, ब्राह्मणांनाही आरक्षण देण्याची मागणी