Haribhau Rathod : 'भुजबळांनी आता घरी बसावं', ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा निशाणा
Mumbai News : हिंगोलीतल पार पडलेल्या ओबीसी एल्गार सभेवर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी भाष्य केलंय. दरम्यान त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना घरी बसण्याचा देखील सल्ला दिलाय.
मुंबई : सध्या राज्यात ओबीसी (OBC) विरुद्ध मराठा (Maratha) असा वाद आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान सध्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने कंबर कसली असून त्यासाठी अनेक काम युद्ध पातळीवर करण्यात येतायत. त्यातच बिहारप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा करणे अशक्य असल्याचं ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी म्हटलं. दरम्यान हिंगोलीत पार पडलेल्या ओबीसींच्या सभेवर देखील हरिभाऊ राठोडांनी भाष्य केलंय. छगन भुजबळांनी आता घरी बसावं असा सल्ला माजी खासदार आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिलाय.
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी फॉर्म्युला सापडला असल्याचं हरिभाऊ राठोडांनी म्हटलं होतं. मराठा समाजाला 50 टक्यांकेच्या आत आरक्षण देणे शक्य आहे, असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं होतं. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटील झाला असून, हा लढा अत्यंत तीव्र झाला आहे, हा लढा सरकारला पेलवणार नाही आणि झेपवणार पण नाही असं सासत्याने मनोज जरांगे म्हणत आहेत. त्यावरच हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला काढला होता.
भुजबळांनी आता तरी घरी बसावं - हरिभाऊ राठोड
भुजबळांनी आता तरी तुम्ही घरी बसायला हवं. तुम्ही खूप नुकसान केलंय आमचं. यापुढे तरी नुकसान करु नका. तुम्ही राजीनामा द्या. सत्तेतून बाहेर पडा, असा सल्ला देखील हरिभाऊ राठोडांनी दिलाय.
भुजबळांचं आजचं भाषण जबरदस्त होतं - हरिभाऊ राठोड
भुजबळसाहेब आजचे तुमचे भाषण अतिशय जबरदस्त आणि तुफानी होते. परंतु मागील तीस वर्षांमध्ये तुम्ही ओबीसींचे प्रचंड नुकसान केले. तुमच्या मुळेच ओबीसींच रिझर्व्हेशन इन प्रमोशन गेलं. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण गेलं. तुम्ही आम्हाला क्रिमिलेयर मधून काढू शकला नाही. तुम्ही सारथी आणि महाज्योती मध्ये फरक केला. भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र संस्था केली नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना होस्टेलमध्ये ॲडमिशन मिळाली तर, सात हजार मिळाले, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना काही मिळाले नाही. हे काही नाही म्हणजे, तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही प्रत्येक निर्णय प्रक्रियेत होता. छगन भुजबळ तुम्ही हे विसरु नका की आज तुम्ही ही आकडेवारी गेली पंचवीस वर्षे दाखवत आहात आम्हाला, असं हरिभाऊ राठोडांनी म्हटलं.
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झालीच नाही - हरिभाऊ राठोड
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झालीच नाही. शिवाय मराठ्याचे ओबीसीकरण होत नाही, तोपर्यंत बिहार प्रमाणे कायदा करून मराठ्यांना आरक्षण देणे अशक्य आहे.परंतु ओबीसीचे सब कॅटेगरायजेशन करून मराठ्यांना आरक्षण देता येईल, असं ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं.
बंजारा आरक्षणाची फाईल कुठे दडवली?
यावेळी हरिभाऊ राठोड यांनी बंजारा आरक्षणावर देखील काही मुद्दे मांडलेत. धनगरांना एसटी आरक्षण देण्यासाठी नुकतीच एक समीती गठीत करण्यात आली. मग बंजारा आरक्षणाची फाईल कुठे दडवली असा सवाल हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केलाय. एसटी च्या संविधानिक यादीमध्ये बंजारा समाज 35 व्या क्रमांकावर आहे. तो नायक , नायका या नावाने आहे. बाजूच्या राज्यातही त्याला S.T.आरक्षण आहे. तर धनगर समाज 36 व्या क्रमांकावर धनगड या नावाने आहे. बंजारा आणि धनगर समाजाची मागणी काही वेगळी नाही. धनगरांना ज्याप्रमाणे सवलती , विविध योजना देण्यात आले आहे, नव्याने विविध योजना आणण्याची चर्चा आहे. धनगराप्रमाणे बंजारा सुद्धा सर्व सवलती आणि योजना देण्यात यावे, तसेच स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी देखील माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली.