Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू नव्हे तर रामनाथ कोविंद यांनीही टाळली होती 'मातोश्री' भेट
भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आदिवासी चेहरा असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना संधी दिली. त्यामुळेच अनेक राजकीय पक्षांची अडचण झाली.
Draupadi Murmu : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल झाल्या आहेत. राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. मात्र मुंबई दौऱ्यावर असलेल्या द्रौपदी यांनी मातोश्रीवर जाणं टाळलं आहे. परंतु या अगोदर एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देखील मातोश्री' भेट टाळली होती.
भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आदिवासी चेहरा असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना संधी दिली. त्यामुळेच अनेक राजकीय पक्षांची अडचण झाली. राज्यातील शिवसेनाही त्यापैकी एक आहे. उद्धव ठाकरे यांना खासदारांच्या दबावापोटी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा लागला.
शिवसेना आणि भाजपची युती असताना भाजपचे दिग्गज नेते मग ते अटल बिहारी वाजपेयी असो की अडवाणी मुंबईत आल्यानंतर मातोश्रीवर आवर्जून हजेरी लावायचे. पण आता काळ बदलला आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत आणि गेल्या अडीच वर्षात शिवसेना आणि भाजपचे संबंधही दुरावले आहेत. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांनीही मातोश्रीवर जाणं टाळलं.
आतापर्यंत कोण कोण मातोश्रीवर गेले होते?
- 2007 साली मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना-भाजपची युती असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला पण त्यावेळीही प्रतिभा पाटील मातोश्रीवर गेल्या नव्हत्या. त्यांचा मुंबई दौरा रद्द झाला होता, त्यांच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील मातोश्रीवर गेले होते
- 2012 मध्ये काँग्रेसकडून प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. याही वेळी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला. त्यावेळी मात्र प्रणव मुखर्जी यांनी आवर्जून मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.
- 2017 मध्ये राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद मैदानात होते. जुलै महिन्यात त्यांनी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा केला होता. त्यावेळी रामनाथ कोविंद यांनीही मातोश्रीवर जाणं टाळलं होतं
गेल्या अडीच वर्षात शिवसेना आणि भाजपचे संबंध दुरावले आहेत आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचे सुरू जुळतात का याची उत्सुकता आहे. दोन्ही पक्षात जवळीकता वाढवण्यासाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक एक निमित्त आहे. शिवसेनेने भाजपला पाठिंबा देऊन एक पाऊल पुढे टाकले आता भाजपची वेळ आहे.