Nilesh Rane : हरिहरेश्वर इथं सापडलेल्या बोटीवरून निलेश राणेंचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले...
Nilesh Rane : निरेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून 26/11 सारख्या हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग : रायगड मधील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटी संदर्भात सुरक्षा यंत्रणेला काहीच माहिती नाही हे दुर्दैव असल्याचे ट्विट भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं आहे. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निलेश राणे यांनी घरचा आहेर दिला आहे.
निरेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून 26/11 सारख्या हल्ल्याची भीती देखील व्यक्त केली आहे. त्या बोटीवर फ्रीज होतं आणि त्यात जेवण होतं ते कुजलेले नव्हतं. मग त्या बोटीवरील व्यक्ती कुठे सटकले. हे प्रखरण हळक्यात घेऊ नये असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
"रायगड जिल्ह्यात हरीहरेश्वरला जी संशयित बोट सापडली त्याबद्दल अद्याप कोणालाच पूर्ण माहिती नाही. त्या बोटीवर जे कोण होते ते अगोदरच सटकले आणि अद्याप सापडलेले नाहीत. फ्रिजमध्ये आणि बोटीवर सापडलेलं सामान यावरून मोठ्या घातपातचं लक्षण दिसतंय. यंत्रणेने गंभीरतेने याकडे लक्ष द्यावं, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
रायगड जिल्ह्यात हरीहरेश्वरला जी संशयित बोट सापडली त्याबद्दल अद्याप कोणालाच पूर्ण माहिती नाही. त्या बोटीवर जे कोण होते ते अगोदरच सटकले आणि अद्याप सापडलेले नाही. फ्रिजमध्ये आणि बोटीवर सापडलेलं सामान यावरून मोठ्या घातपात चं लक्षण दिसतंय. यंत्रणेने गंभीरतेने याकडे लक्ष द्यावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 20, 2022
काय आहे प्रकरण?
गुरुवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन 'अॅसॉल्ट रायफल', स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.