भाजपाचं 1 मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही, भाजपच्या नेत्याचं वक्तव्य, महायुतीमधील कलह वाढला?
भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला (NCP) मिळणार नाही. त्यांनी लोकसभेत युतीधर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार असल्याचे वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख (Dilip Deshmukh) यांनी केलं.
Maharashtra Politicis : भाजप (BJP) म्हटले की राष्ट्रवादी वाल्यांचे डोकं उठतं. त्यामुळं भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला (NCP) मिळणार नाही. त्यांनी लोकसभेत युतीधर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार असल्याचे वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख (Dilip Deshmukh) यांनी केलं. त्यामुळं आता महायुतीमधील कलह आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
निधी वाटपात कायमच भाजपला डावलले
भारतीय जनता पक्षाचे एकही मत राष्ट्रवादीला पडणार नाही असा निर्धार लातूर ग्राणीच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादीमधील दरी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा अहमदपूरला आली होती. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील वाद उफाळून आल्याचं समोर आले आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, निधी वाटपात कायमच भाजपला डावलले गेल्यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली.
रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांची काढली समजूत
अहमदपूर भाजपने घेतलेले या भूमिकेमुळे अजित पवार यांना यावर प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही कार्यकर्त्यांना याविषयी योग्य ती समजून काढली जाईल अशी भूमिका घेतली होती. यानंतरही भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतही देणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमधली दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले दिलीप देशमुख?
अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारासाठी काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत भाजपाला पडलं नाही. यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला. अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्यात आला आहे. मात्र निधी वाटपात भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं. भाजपा म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठत होतं असे देशमुख म्हणाले. आता विधानसभेची निवडणूक आहे. भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना पडणार नाही, आम्ही पडू देणार नाही अशी भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या: