Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय शेवटच्या क्षणी, त्यावर कोणतीही चर्चा नाही; शरद पवारांची नाराजी
औरंगाबादच्या नामांतरापेक्षा शहरातील मूलभूत प्रश्न सोडवले असते तर बरं झाले असतं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले
औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नामांतर करताना कोणतीही चर्चा झाली नव्हती, हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला गेला असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. शरद पवार म्हणाले की, "औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आलं, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण या नामांतरापेक्षा औरंगाबादच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं."
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणताही विरोध केला नाही, त्यांनी याचं समर्थन केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. पण आता यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्यांनी हा निर्णय घेताना कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा केला. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला आणि नंतर आपल्याला समजल्याची माहिती त्यांनी दिली.
हे चमत्कारिक राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. त्यांच्याकडे बहुतेक खूप काम असेल. पण दुसरं सरकार आलं आणि त्यांनी ही मागणी 48 तासामध्ये मान्य केली. हे असं करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील."
आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जपणारे राज्यपाल मिळाले होते. हे आताचे जरा चमत्कारिक राज्यपाल आहेत, पण राज्यपाल असल्याने मी त्यांच्यावर जास्त काही बोलणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावला.