खासदार अमोल कोल्हे यांच्या एकांतवासाचं गुपित अखेर उलगडलं, व्हिडीओ जारी करत म्हणाले...
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (DR Amol Kolhe) यांच्या एकांतवासाचं गुपित अखेर उलगडलं आहे. त्यांनी व्हिडीओ जारी करत स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (DR Amol Kolhe) यांच्या एकांतवासाचं गुपित अखेर उलगडलं आहे. त्यांनी व्हिडीओ जारी करत स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. युट्यूबला व्हिडीओ टाकत त्यांनी म्हटलं की, मी एकांतवासात 7 नोव्हेंबर रोजी जाण्याबाबत पोस्ट केली. त्यानंतर तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या. माझ्या एकांतवासाविषयी अनेक चर्चा रंगल्यानंतर मला असं वाटलं की, आपण स्वत:च याचा उलगडा करावा. अमोल कोल्हे म्हणाले की, एकांतवासात जाण्यामागे कुठलाही राजकीय हेतू या पाठीमागे नव्हता. मानसिक थकवा स्वीकारणं ही काळाची गरज असं आहे असं म्हणत अमोल कोल्हे यांनी या एकांतवासाला नकारात्मक दृष्टीने पाहिलं गेल्याबद्दल खंत व्यक्त केली.
माझ्या एकांतवासाबाबत अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. काहींनी तर राजकीय पक्षांतरबाबत देखील भाष्य केलं. मात्र माझ्या एकांतवासात जाण्याचं कारण होतं मानसिक विश्रांतीचं आहे, असं ते म्हणाले. आपण व्यक्त कुठं व्हायचं हा प्रश्न उभारतो आणि मग साचलेपण येत. त्यातून मधुमेह, हृदयविकार असे अनेक विकार समोर येतात. त्यामुळं व्यक्त होणं, मोकळं होणं महत्वाचं आहे. व्यक्त होणं हे जीवंतपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले.
डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, मानसिक थकवा स्वीकारणं गरजेचं आहे. मी या एकांतवासात काय शिकलो हे नक्कीच तुम्हाला कळेल. कुणी एकांतवासात जातोय म्हणजे त्याला नकारात्मक का घ्यायचं. त्याला सकारात्मक पद्धतीनं का घेऊ शकत नाहीत. मला या एकांतवासात एक व्यक्त होण्याचं माध्यम सापडलं असं कोल्हे म्हणाले.
काय म्हणाले होते डॉ अमोल कोल्हे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी मनन आणि चिंतनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि फेरविचार करण्यासाठी आपल्याला एकांत हवा असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. "सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने. फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असंही कोल्हे म्हणाले होते.