Ncp Comment on Governor : मराठी माणसाच्या कष्टावर मुंबई उभी! दिल्लीतील बॉसला खुश करण्याचा राज्यपालांचा चंग, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
Ncp Comment on Governor : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्र आणि मुंबई (Maharashtra And Mumbai) संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. काही महामहीम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळं मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (
Jayant Patil ) यांनी केलं आहे. तर राज्यपाल महोदयांचे वक्तव्य हे हुतात्म्यांचा अवमान करणारे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केलं आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत?
घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून, राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावं. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान मा. राज्यपाल महोदय करत असल्याचे पाटील म्हणाले. महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे वक्तव्य मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत ? असे सवालही जयंत पाटील यांनी भाजपला केले आहेत.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही 'आमची मुंबई ' असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या: