मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. काल शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वर बैठक झाली. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तुम्ही वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा. आम्हालाही तयारीला लागता येईल असं ते म्हणाले. जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसंही सांगा, असं शरद पवार म्हणाले असल्याची माहिती आहे. शरद पवार म्हणाले की, पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले मात्र गैरहजर होते.
Sharad Pawar : विधानसभा अध्यक्षपद कुणाचं? शरद पवारांचं मोठं वक्तव्य...
शरद पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटलं होतं की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी भाष्य केलं असतं असा टोला देखील त्यांनी लगावला होता. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही
कॉंग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले होते की, प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही. त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. त्यांनी भूमिका घेतली, यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे.. ते एक विचारानं काम करतात, असं ते म्हणाले.
Sharad Pawar : पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य
काय म्हणाले होते नाना पटोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी आपण हे वक्तव्य केंद्राला उद्देशून केलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.