नांदेड: लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अनेकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं काही महिन्या पूर्वी त्याचं दुर्दैवी निधन झाले.त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची ती जागा आता रिक्त झालीय. त्यामुळे त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसात पोटनिवडणूक होणार आहेत.
देगलूर-बिलोली-90 राखीव मतदारसंघातून अनेक आजी माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते ,उद्योजक विविध पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. अशातच आता या मतदारसंघातून लावणी साम्राज्ञी अशी महाराष्ट्रभर ओळख असणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी आमदारकीची उमेदवारी मगितल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली-90 विधानसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे तशी त्यांनी मागणी केलीय. जर मला शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी संधी दिली तर मी देगलूर विधानसभा लढून आमदारकी जिंकेल आणि जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया सुरेखा पुणेकर यांनी दिलीय.
लोकसभा नाही तर किमान विधानसभेला तरी विचार व्हावा, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची खंत
कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्याच्या सीमेवर व महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा व्हावा तसा विकास अद्याप झालेला नसून मला जर संधी भेटली तर मी नक्की या संधीचे सोने करेन आणि विजय खेचून आणीन असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
याआधीही व्यक्त केली होती इच्छा
सुरेखा पुणेकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी देखील अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात लोककलेचा प्रसार केला. हजारो लोककलावंत आज महाराष्ट्रात तळागाळात आहे. आम्ही लोकांचं मनोरंजन करतो. आज तमाशा कलावंत आणि लावणी कलावंतांचे हाल आहेत, आमचा प्रश्न एखादा आमदार किंवा खासदार का उचलत नाही. त्यामुळे आमच्यातूनच एखादा प्रतिनिधी पुढे येणे गरजेचे आहे, त्यामुळे मला निवडणूक लढवायची आहे, असे पुणेकर त्यावेळी म्हणाल्या होत्या.