Praveen Raut Arrest : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत (Praveen Raut) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. एचडीआयएलमधील (HIDL) 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. दरम्यान, गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रवीण राऊत हे नातेवाईक आहेत. 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते ईडीच्या रडारवर होते. मंगळवारी प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेलं होतं. ईडीच्या कार्यालयात प्रवीण राऊत यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. 


पाहा व्हिडीओ : प्रवीण राऊत आहेत तरी कोण?



पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त 


पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचं उत्तर ईडीला हवं आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं होतं. 


कोण आहेत प्रवीण राऊत? 


प्रवीण राऊत संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले, असा आरोप ईडीने केला. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha