Nitesh Rane :  शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  त्यामुळे नितेश राणे आता जामिनासाठी अर्ज करणार आहेत. नितेश राणे सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात आज शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.


न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मिळालेले नाही.   


नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. नितेश राणे यांनी 10 दिवसांत  सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले. 


दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो अशी प्रतिक्रीया दिली आहे. काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं जो निर्णय दिला. त्या निर्णयाचा आदर ठेवून मी आता शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीनं मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वतःहून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात आहे." असे नितेश राणे यांनी म्हटले होते.


या संपूर्ण प्रकरणादम्यान, कणकवली न्यायालया बाहेर पोसीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची तांगती तलवार होती. अनेक दिवस राणे पोलिसांनाही मिळाले नव्हते. 


दरम्यान, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी  मागितल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठविली आहे. 


काय आहे प्रकरण?  


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या