(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता खरंच ईडी लागली मागे, आता सीडी लावण्याचं काम बाकी : एकनाथ खडसे
ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता खरंच ईडी लागली मागे, आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे; असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला आहे.
जळगाव : "तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन', असं मी गमतीनं बोललं होतो. राष्ट्रवादीत प्रवेश करताना जयंत पाटील मला म्हणाले होतो की, तुमच्या मागे ईडी लागली तर...? तेव्हा मी म्हटलं सीडी लावेन. आता खरंच लागली मागे ईडी. पण सीडी लावण्याचं काम आता बाकी आहे.", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कोणाचंही नाव न घेता भाजपला इशारा दिला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात रात्री संवाद यात्रेदरम्यान बोलताना एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केलं.
एकनाथ खडसे म्हणाले की, "मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे." असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा दिला आहे.
पक्षप्रवेशावेळी काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
भाजप सोडून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, "दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले, तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितलं."
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. सध्या ते जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी ईडी चौकशीवरून जोरदार निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या :